सायकल चालविताना ६५ टक्के महिलांना भरधाव वाहनांची भीती; स्मार्टसिटी कंपनीतर्फे सर्वेक्षण  

विक्रांत मते
Friday, 23 October 2020

स्मार्टसिटी कंपनीतर्फे सायकल चालविण्यासंदर्भात शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ टक्के महिलांना सायकल चालविताना भरधाव वाहनांची भीती वाटते, तर खड्डे व उघड्या गटारांमुळे ४७.६ टक्के पुरुषांना अपघात होण्याची भीती वाटत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीतर्फे सायकल चालविण्यासंदर्भात शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ टक्के महिलांना सायकल चालविताना भरधाव वाहनांची भीती वाटते, तर खड्डे व उघड्या गटारांमुळे ४७.६ टक्के पुरुषांना अपघात होण्याची भीती वाटत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

सायकल चालविताना ६५ टक्के महिलांना भरधाव वाहनांची भीती
इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज उपक्रमात नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीही सहभागी झाली आहे. पहिल्या दहा शहरांत येण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीतर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हँडल बार सर्वेक्षण, महात्मा गांधी जयंतीनिमित्त सायक्लॉथॉन, सायकल असोसिएशन्स व स्वयंसेवी संस्थांसह निमा, आयमा, क्रेडाई आणि विविध संस्थांसोबत वेबिनार व बैठका घेण्यात आल्या. त्याचबरोबर त्र्यंबक नाका ते पपया नर्सरी या मार्गावर दोन्ही बाजूने पॉपअप सायकल ट्रॅक प्रस्तावित करण्यात आला. सायकलसंदर्भात नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यात विविध प्रश्‍न विचारण्यात आले. या प्रश्‍नांच्या उत्तरातून स्मार्टसिटी कंपनीला उत्तरे प्राप्त झाली, त्यातून सायकलसंदर्भात विविध निरीक्षणे नोंदविण्यात आली. ९२ टक्के पुरुष व ५९ टक्के महिलांना शहरात सायकल चालविता येते. ६६.१ टक्के नागरिक दररोज, तर १५ टक्के नागरिक आठ दिवसांतून एकदा सायकल चालवितात. कामावर व व्यायामासाठी सायकलचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या अधिक आहे, तर महिला हौस म्हणून व व्यायामासाठी सायकल चालवितात. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

वाहतूक कोंडी अडचणीची 
सायकल चालविताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात, या प्रश्‍नावर ६५.६ टक्के महिलांना भरधाव वाहनांची भीती वाटत असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. ४७.६ टक्के पुरुषांना सायकल चालविताना खड्डे व उघड्या गटारींची भीती वाटत असल्याची नोंद घेण्यात आली. ५० टक्के महिला बेशिस्त पार्किंग व पायी चालणाऱ्या नागरिकांना घाबरतात. वाहतूक कोंडीमुळे सायकल न चालविणाऱ्यांचे प्रमाण ४१ टक्के नोंदविण्यात आले. 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

काय आहे उपक्रम? 
सायकल चालविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज उपक्रम राबविला जात आहे. नाशिकसह देशातील १०७ शहरे सहभागी आहेत. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सहभागी शहरांना पायलट इंटरव्हेंशन्स करायचे आहेत. याच पायलट इंटरव्हेशन्सच्या मदतीने ११ शहरांना प्रत्येकी एक कोटी रुपये सायकलिंगसाठी उत्तम पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी प्राप्त होणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women fear heavy vehicles while cycling nashik marathi news