'महिलांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात' - कृषिमंत्री दादा भुसे

प्रमोद सावंत
Monday, 19 October 2020

कृषी विभागाने महिलांच्या शेतीशाळा घ्याव्यात. तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास शेती उत्पादनात निश्चीतच भर पडेल. शासनाकडून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर भाजीपाला रोपे मिळण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिकेसाठी अनुदान देणार आहे. यात प्राधान्याने महिला कृषी पदवीधरांना लाभ दिला जाईल. 

नाव : (मालेगाव) शेतावर राबणाऱ्या महिलांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात. शेती उत्पादित मालाला बाजारपेठेत स्थान निर्माण करून महिलांनी शेतकरी उद्योजक बनून मानसन्मान मिळवावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी दाभाडी येथे शुक्रवारी (ता.१६) केले.दाभाडी येथील भावना निकम यांच्या शेतावर राष्ट्रीय महिला किसान दिन कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

भाजीपाला रोपवाटिकेसाठी अनुदान देणार

श्री. भुसे म्हणाले, की ‘सशक्त महिला-सशक्त भारत’ ही संकल्पना देशात व राज्यात राबविण्यात येत आहे. आज महिला शेतकरी काबाडकष्ट करत असून, त्यांना पैशांची बचत करणे, आर्थिक व्यवहार करणे, भाजीपाल्याची स्वच्छता व प्रतवारी करून बाजारात पाठविणे, मूल्यवर्धन करणे आदी कामे करीत आहेत. मात्र अद्यापही त्या उपेक्षित आहेत. महिलांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे. कृषी विभागाने महिलांच्या शेतीशाळा घ्याव्यात. तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास शेती उत्पादनात निश्चीतच भर पडेल. शासनाकडून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर भाजीपाला रोपे मिळण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिकेसाठी अनुदान देणार आहे. यात प्राधान्याने महिला कृषी पदवीधरांना लाभ दिला जाईल. 

जुन्या वाणांची जपणूक करा

महिलांसाठी शेतीला दिवसा वीजपुरवठा, महिलांच्या क्षेत्रीय भेटी, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, चर्चासत्र यासाठी शासन व कृषी विभाग प्रयत्नशील आहे. राहीबाई पोपरे (अकोले) यांच्याप्रमाणे महिलांनी बियाणे बँकेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जुन्या वाणांची जपणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. भावना निकम, कासूबाई जाधव, हिराबाई निकम, सुषमा निकम आदींचा श्री. भुसे यांच्या हस्ते सत्कार झाला. कृषी विभागाच्या गीतांजली लकारे, दीप्ती तवर यांनी कृषी योजनांची माहिती दिली. ज्येष्ठ शेतकरी महिलांनी कुटुंब व्यवस्थापन व शेतीविषयक अनुभव सांगितले. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

श्री. भुसे यांनी यू-ट्यूबच्या माध्यमातून राज्यातील महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी सहायक सुरेखा विसापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. उपविभागीय कृषी अधिकारी देवरे यांनी आभार मानले.. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, आकाशवाणी केंद्राचे नानासाहेब पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women should set up farming companies - Dada Bhuse nashik marathi news