
मनमाड (जि. नाशिक) : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कासवगतीने सुरू असलेल्या डीसीएचसी कोविड सेंटरचे रेंगाळलेले काम पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. शहरात कोरोनामुळे हाहाकार उडाला असून, कुठलीच उपाययोजना नसल्याने किती जणांचा जीव गमवल्यानंतर सेंटर सुरू करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या मनमाड शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. देखाव्यात आणि कागदी घोडे नाचविण्यात मश्गुल असलेले पालिका प्रशासन कुठलीच उपाययोजना करताना दिसत नाही. शहरात कोविड सेंटर व्हावे, यासाठी थेट आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न सुरू आहेत. सर्वपक्षीय नेते आपापल्या परीने कोविड सेंटर मिळावे यासाठी आंदोलन, निवेदन देत आहेत. या सर्वांच्या मागणीमुळे अखेर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मनमाडमध्ये बैठक घेत तातडीने ऑक्सिजन बेड असलेले कोविड सेंटर उभारण्याचे आदेश दिले. कामाला सुरवात झाली, मात्र सरकारी काम लवकर पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. शहरातील गरीब नागरिकांना पैसे नसताना कर्ज काढून खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.
कोविड सेंटरचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू असून, एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करणारे तालुका वैद्यकीय अधिकारी ससाणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एस. नरवणे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनाही केवळ काम सुरू आहे, असा भास दाखवत असतानाच बुधवारी सीईओ लीना बनसोड यांनी पाहणी केली. काम पूर्ण होत नसल्याने अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिरंगाईचे कारण विचारले. आतापर्यंत काम पूर्ण होऊन रुग्णावर उपचार सुरू व्हायला पाहिजे होते, मात्र तसे झाले नाही. सीईओ बनसोड यांनी ३० पेक्षा अधिक बेड असलेले सेंटर सुरू करणार असल्याचे सांगितले.
सीईओ लीना बनसोड यांनी कोविड सेंटरच्या सुरू असलेल्या कामावर भेट देत पाहणी केली. धिम्यागतीने काम सुरू असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन दिवसांत काम होऊन सेंटर सुरू झाले पाहिजे, लवकरच ५० बेडचेही सेंटर सुरू करावे, असा आदेश दिले आहेत.
-गणेश धात्रक, गटनेते, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.