लोणचं प्रेमींनो! यंदा लोणच्याची बरणी रिकामी तर राहणार नाही ना..?वाचा सविस्तर

मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जून 2020

लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण आवडीचे लोणचे खातो. त्यामुळे दरवर्षी घरोघरी आंबट कैरींचे लोणचे केले जाते. त्यासाठी मे महिन्यातच गावठी कैऱ्या बाजारात विक्रीसाठी यायला सुरुवात होते. परंतु यंदा लोणच्याच्या बरण्या रिकाम्याच राहणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.

नाशिक / देवळा : लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण आवडीचे लोणचे खातो. त्यामुळे दरवर्षी घरोघरी आंबट कैरींचे लोणचे केले जाते. त्यासाठी मे महिन्यातच गावठी कैऱ्या बाजारात विक्रीसाठी यायला सुरुवात होते. परंतु यंदा लोणच्याच्या बरण्या रिकाम्याच राहणार का असा प्रश्न उपस्थित होतो

औंदा बरणी रिकामीच राहते कि काय? 

यंदा गावठी आंब्याला दरवर्षी इतका बहार नसल्याने लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांचे प्रमाण यावर्षी कमी असल्याचे चित्र आहे. जून महिना लागला असला तरी अद्याप बाजारात कैऱ्या येत नसल्याने लोणच्याची बरणी औंदा रिकामीच राहते कि काय अशी शंका येवू लागली आहे. लोणचे शौकिन गावठी कैऱ्यांच्या शोधात असले तरी कैऱ्यांची दुर्मिळता असल्याने बाजारातही अद्याप गावठी कैऱ्या विक्रीसाठी दिसून येत नाहीत.

आम्हालाच नाहीत तर विकायला कोठून आणू ?

लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण आवडीचे लोणचे खातो. त्यामुळे दरवर्षी घरोघरी आंबट कैरींचे लोणचे केले जाते. त्यासाठी मे महिन्यातच गावठी कैऱ्या बाजारात विक्रीसाठी यायला सुरुवात होते. परंतु यंदा मात्र झाडांनाच कैऱ्या नसल्याने त्या कोठून येणार ? येथील बाजारात दरवर्षी कळवण, अभोणा, कनाशी, दळवट, सुरगाणा या भागातील शेतकरी गावठी व इतर प्रकारच्या कैऱ्या विक्रीसाठी आणतात. त्यांच्याशी संपर्क साधला असता आम्हालाच नाहीत तर विकायला कोठून ? असे उत्तर मिळत आहे. यामुळे यंदा गावठी आंब्यांचेही (कैऱ्या) भाव तडकणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महिलावर्गाला सतावतेय चिंता..

गेल्या वर्षी पाऊस उशिरापर्यंत असल्याने काहीना मोहरच आला नाही. काहींना आला तर तो गळून पडला. त्यामुळे दरवर्षी आंब्यांनी लगडलेल्या झाडांना फलधारणा झालीच नाही. त्याचा परिणाम आंबा हंगामावर झाला आहे. महिला वर्गाने लोणचे भरण्यासाठी इतर तयारी केली असली तरी आता कैऱ्यांची वाट पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. वर्षभरातील एक टिकाऊ व तोंडी लावण्याचा प्रमुख खाद्यपदार्थ म्हणून प्रत्येक घरी लोणचे केले जाते. लोणच्यासाठी लागणारी लाल मिरची, बडीशोप, लवंग, मिरी, वेलदोडे, राई, मोहरी, तेल, मीठ या मसाल्यांच्या पदार्थांसोबत खारा- बरणी यांचीही खरेदी केली जात असली तरी मुख्य कच्चा माल कैऱ्याच मिळत नसल्याने लोणचे होणार कि बरणी रिकामी राहणार असा प्रश्न महिलावर्गाला सतावत आहे.

कैऱ्यांची शोधाशोध

 येथील ग्रामीण भागातही गावठी आंबे येत असत. त्यामुळे बहिणी- भाच्या, लेकी-बाळी यांना वानोळा म्हणून कैऱ्या पुरवल्या जात. परंतु यंदा ज्यांची आंब्यांची झाडे त्यांनाच कैऱ्यांची शोधाशोध करावी लागत असल्याने 'वानोळानी वाट पाहू नका, आमलेच नही शेत' असा संदेश दिला जात आहे.

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

थोडाफार मोहर आला तोही गळून पडला

 " दरवर्षी आम्ही गावठी व इतर कैऱ्या काही हजारात विकायचो आणि नातेवाइकांनाही द्यायचो. परंतु यंदा प्रतिकूल वातावरणामुळे आंब्यांना मोहर आला नाही. ज्या किरकोळ आंब्यांना थोडाफार मोहर आला होता तोही नंतर गळून पडला. यंदा आम्हालाच विकत आंबे घेण्याची वेळ आली आहे." - दगा वाघ, शिरसमनी ता. कळवण

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year the price of village mangoes will also rise up nashik marathi news