दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

नाशिकमध्ये यापूर्वी चार हजार रुग्ण आढळतील, असा अंदाज होता. त्यादृष्टीने महापालिकेने चारशे बेड तयार ठेवले होते. नव्या अंदाजानुसार 523 रुग्ण आढळतील, असे सांगण्यात आले. परंतु योग्य उपाययोजनांमुळे आतापर्यंत  कोविड रुग्णांची संख्या मर्यादित राहिली आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी फक्त दहा रुग्ण नाशिकचे आहेत.

नाशिक : राज्य शासनाचे आरोग्य संचालनालय जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा अंदाज वर्तविते. त्यानुसार, 15 मेपर्यंत नाशिक शहरात 523 कोरोना पॉझिटिव्ह आढळतील, असा अंदाज वर्तविला होता. परंतु महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे शासनाच्या अंदाजापेक्षा खूपच कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत 47 रुग्ण आढळल्याचा आकडा पाहिल्यास शासनाच्या अंदाजापेक्षा 476 रुग्ण कमी आढळल्याची बाब महापालिकेच्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाली आहे. 

महापालिकेकडून तातडीने उपाययोजना हाती

मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये मार्चमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असताना नाशिकमध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता. या शहरांप्रमाणेच नाशिक मोठे शहर असल्याने महापालिकेकडून तातडीने उपाययोजना हाती घेतल्या.शहरात 75 किलोमीटर क्षेत्रात निर्जंतुकीकरण करणे, 36 चौरस किलोमीटर क्षेत्रात कोरोना सुविधा पुरविणे, 287 मलेरिया कर्मचाऱ्यांकडून 109 किलोमीटर क्षेत्रात औषध फवारणी, 748 मेडिकल ऑफिसर व एक हजार 500 सफाई कर्मचारी यांना मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर सुविधा, कोविड सरंक्षणासाठी 14 संस्थात्मक वॉर्ड व त्यात 72 बेडची सुविधा, कंटेन्मेंट झोनमध्ये वैद्यकीय पथकांची नियुक्ती, स्मार्ट फोनवर महाकवाच ऍप उपलब्ध करणे, नाशिक बाजार ऍपच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन भाजीपाला उपलब्ध करून देणे, एनएमसी ई-कनेक्‍ट ऍपद्वारे 11 प्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे, चोवीस तास हेल्पलाइन डेस्क सुविधा उपलब्ध करून देणे, कमांड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून कोविड 19 रुग्णांचे निरीक्षण करणे, महापालिका रुग्णालयात कोविड रुग्ण तपासण्यासाठी एरोसेन पेटी उपलब्ध करून देणे, कोविड रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्यासाठी सर्वेक्षण, गर्दी टाळण्यासाठी 106 भाजी मार्केटची निर्मिती, नागरिकांना थेट भाजीपाला घरपोच पुरविणे, डॉक्‍टर आपल्या दारी उपक्रम राबविणे आदी उपाययोजना केल्याने महापालिकाहद्दीत कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड होऊ शकला नाही. त्याचा परिणाम शहरात केवळ 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

फक्त दहा रुग्णच नाशिकचे

नाशिकमध्ये यापूर्वी चार हजार रुग्ण आढळतील, असा अंदाज होता. त्यादृष्टीने महापालिकेने चारशे बेड तयार ठेवले होते. नव्या अंदाजानुसार 523 रुग्ण आढळतील, असे सांगण्यात आले. परंतु योग्य उपाययोजनांमुळे आतापर्यंत 47 पर्यंत कोविड 19 रुग्णांची संख्या मर्यादित राहिली आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी फक्त दहा रुग्ण नाशिकचे आहेत. - राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका 

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reasons of Corona gets break in Nashik marathi news