
अंबासन गावात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईस ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध केल्याच्या रागातून सरपंचांनी सूडबुद्धीतून आपल्या दोन भावांच्या मदतीने "सकाळ'चे बातमीदार दीपक खैरनार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व ठार मारण्याची धमकी दिली होती.मात्र पुढे..
नाशिक / सटाणा : अंबासन गावात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईस ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध केल्याच्या रागातून सरपंचांनी सूडबुद्धीतून आपल्या दोन भावांच्या मदतीने "सकाळ'चे बातमीदार दीपक खैरनार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व ठार मारण्याची धमकी दिली होती.मात्र पुढे..
असा घडला प्रकार..बागलाण तालुक्यात चर्चेला उधाण
कोरोनामुळे अंबासनच्या सरपंचांची नाशिक मध्यवर्ती कारगृहाची वारी टळली, या चर्चेला बागलाण तालुक्यात उधाण आले आहे. अंबासन गावात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईस ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध केल्याच्या रागातून सरपंच जितेंद्र अहिरे यांनी शुक्रवारी (ता. 15) सूडबुद्धीतून आपल्या दोन भावांच्या मदतीने "सकाळ'चे बातमीदार दीपक खैरनार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी सरपंच अहिरे व त्यांच्या दोघा भावांना जायखेडा पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये अटक केली होती. बातमीदार दीपक खैरनार यांच्यावर नामपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, शनिवारी (ता. 16) संशयितांना सटाणा न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. नंतर सरकारी वकील रजेवर असल्याने संशयितांना जामीन मिळाला. जायखेडा पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडताना कोरोनाचा आधार घेतला. त्यामुळे न्यायालयाने संशयितांना जामिनावर मुक्त केले. यामुळे जायखेडा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार
सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सरपंचाला धडा शिकवावा...
जीवघेणा हल्ला करूनही सरपंच अहिरे व त्यांचे दोन्ही भाऊ कायद्याच्या कचाट्यातून सुटले कसे, याबाबतही चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता, सर्व तुरुंगामध्ये कोरोनाचा संसर्ग आढळल्याने अजामीनपात्र व गंभीर आरोप असल्याशिवाय कैद्यांना भरती न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचा फायदा संशयितांना मिळाला. सटाणा न्यायालयाने दोन्ही संशयितांची जामिनावर मुक्तता केली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अंबासनचे सरपंच कोरोनासंदर्भात आवश्यक ती जनजागृती करू शकले नाहीत. 14 व्या वित्त आयोगातून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी खर्चही केला नाही. गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले नसल्याचे विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होऊन सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सरपंचाला धडा शिकवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार