प्रभागातील समस्यांवर नगरसेवकाचे "डिजिटल' समाधान 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मे 2019

प्रभागातील समस्यांवर नगरसेवकाचे "डिजिटल' समाधान 

प्रभागातील समस्यांवर नगरसेवकाचे "डिजिटल' समाधान 

जळगाव, ता. 28 : निवडणुकीच्या हंगामात दिसणारे लोकप्रतिनिधी विशेषत: नगरसेवक पाच वर्षांसाठी गायब होतात.. त्यांचे संपर्क क्रमांक मिळविणेही कठीण जाते, ते मिळालेच तर संपर्क होईलच, याची शाश्‍वती नाही.. अशा वातावरणात प्रभागातील नागरिकांना समस्या मांडण्यासाठी "व्हॉटस्‌ऍप' ग्रुपचे माध्यम उपलब्ध करून देत प्रत्येक तक्रारीवर उत्तर देण्याचा प्रयत्न करणारा स्तुत्य उपक्रम महापालिका स्थायी समितीचे सभापती असलेल्या जितेंद्र मराठे यांनी राबविला आहे. 
जळगावसारख्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा बोजा असलेल्या महापालिकेकडून कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधेची दखल घेतली जाणे ही बाब तशी दुर्मिळच. त्यातही वर्षानुवर्षे काही नगरसेवक सातत्याने निवडून येत असले तरी नागरिकांशी त्यांच्या समस्यांबाबत नगरसेवकांची "नाळ' कधी जुळल्याचेही ऐकिवात नाही. 

जितेंद्र मराठेंचा स्तुत्य प्रयत्न 
एकूणच नगरसेवकांबद्दलची नागरिकांची मानसिकता नकारात्मक असताना प्रभाग क्रमांक 13 मधील भाजप सदस्य तथा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे त्यास अपवाद ठरले आहेत. प्रभागात आधीपासूनच काम करणारे मराठे नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेत. तरीही त्यांनी निवडून येताच आपल्या प्रभागातील समस्या, नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी तीन-चार व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार केले. या प्रत्येक ग्रुपमध्ये प्रभागातील नागरिकांना समाविष्ट करून घेतले आहे. 

ग्रुपमध्ये सतत "अलर्ट' 
या ग्रुपवर प्रभागातील नागरिक वेगवेगळ्या समस्या मांडतात. मूलभूत सुविधांच्या संदर्भात तक्रारी करतात. अनेकदा नगरसेवकांबद्दल नाराजीही व्यक्त करतात. मात्र, प्रत्येक समस्या व तक्रारीवर समाधान करण्याचा प्रयत्न मराठेंकडून केला जातो. विशेष म्हणजे प्रत्येक तक्रारीवर मराठे आवर्जून उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. सर्वच समस्या, तक्रारी सोडविल्या जातात, असेही नाही. मात्र, काही कामे अगदीच किरकोळ व नगरसेवकाच्या हातची असतात, ती यातून सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी मराठे यांनी त्यांचे दोन-तीन सहकारीही कामाला लावले आहेत. विशेष म्हणजे, या ग्रुपवर प्रत्येक समस्या, तक्रार जाणून घेण्यासाठी ते अलर्ट असतात. आणि त्यातील बहुतांश तक्रारींवर अगदी दहा- पंधरा मिनिटांच्या आत उत्तरही देतात. मग हे उत्तर संदेश, ऑडिओ संदेशाच्या रूपातही असते. 

अन्य नगरसेवकांचे काय? 
प्रभाग क्रमांक 13 मध्ये मराठेंसोबतच ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे व अंजनाबाई प्रभाकर सोनवणे हे तीन नगरसेवकही आहेत. त्यामुळे हा प्रभाग केवळ मराठेंचा नाही. असे असले तरी या तीन नगरसेवकांकडून अद्याप अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात आल्याचे दिसून आले नाही. अर्थात, जळगाव शहरातील अन्य प्रभागांतही अशाप्रकारे नागरी समस्यांसाठी नगरसेवकानेच व्हॉटस्‌ऍप ग्रुप निर्माण करून त्या जाणून घेत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. 

कोट.. 
नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर काही दिवसांतच हा उपक्रम सुरू केला. प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. व्हॉटस्‌ऍप ग्रुप व व्यक्तिश: दूरध्वनीवरुनही तक्रारी जाणून घेतो. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या गोष्टी आमच्या हाती असतात, त्या करायला काय हरकत आहे? 
- जितेंद्र मराठे 
सभापती, स्थायी समिती, मनपा. 
--------------- 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: प्रभागातील समस्यांवर नगरसेवकाचे "डिजिटल' समाधान