मनपा सभागृहात नव्हे, लोकांच्या मनात स्थान : नितीन सपके

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मनपा सभागृहात नव्हे, लोकांच्या मनात स्थान : नितीन सपके

मनपा सभागृहात नव्हे, लोकांच्या मनात स्थान : नितीन सपके

जळगाव : प्रभागात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करतो, या निवडणुकीत पराभव झाला म्हणून ते थांबवणार नाही. मुळात, प्रचारादरम्यान आणि निकालानंतरही अनेक लोक भेटले. त्यांनी दर्शविलेला विश्‍वास मोठा आहे, त्यामुळे या निवडणुकीतील हा थोड्या फरकाने झालेला पराभव मी मानतच नाही, असे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रभाग 13 मधील उमेदवार नितीन सपके यांनी व्यक्त केले. 
महापालिका निवडणुकीत यावेळी प्रभाग 13 "क'मधून नितीन सपके शिवसेनेचे उमेदवार होते. भाजपचे मंडलाध्यक्ष नवखे उमेदवार जितेंद्र मराठे यांनी त्यांचा सुमारे साडेपाचशे मतांनी पराभव केला. दोघेही उमेदवार याच प्रभागातील रहिवासी. नितीन सपके यांनी याआधीही गेल्या पंचवार्षिकला निवडणूक लढली होती, मात्र त्यावेळीही त्यांना यश मिळाले नाही. मात्र, त्या पराभवानंतरही सपके यांचे या भागातील सामाजिक कार्य सुरूच होते. 

उच्चशिक्षित उमेदवार 
पदवीधर असलेले नितीन सपके राज्य लोकसेवा आयोगाची "पीएसआय'ची परीक्षाही उत्तीर्ण आहेत. निर्मिती फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या प्रभागात ते सामाजिक कार्य करतात. रक्तदान शिबिर, कोणत्याही दुर्गम ठिकाणी सहलीस जाताना तेथील गरजू मुलांना साहित्य वाटप असे उपक्रम ते राबवीत असतात. शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये निर्मिती फाउंडेशनचा सहभाग असतो. 

पराभव मान्य नाहीच 
या निवडणुकीच्या निकालासंदर्भात विचारले असता सपके म्हणाले, 8-10 वर्षांपासून माझे सामाजिक कार्य सुरु आहे. त्याला थोडी राजकारणाची जोड देऊन मी ते पुढे सुरू ठेवले. गेल्यावेळी पराभव झाला होता, तो मी स्वीकारला. मात्र, यावेळचा पराभव माझ्यासह प्रभागातील नागरिकांसाठी आश्‍चर्याचा धक्का होता. प्रचारादरम्यान अनेक लोक भेटले, त्यांनी विश्‍वास दर्शविला, ते प्रत्यक्ष प्रचारात सहभागी झाले. विजयाची खात्री होती. प्रतिस्पर्धी उमेदवार नवखे होते, त्यांच्या पक्षाची लाटही नव्हती. असे असताना केवळ कमळाच्या चिन्हाकडे पाहून मतदान झाले असेल, हे मान्य नाही. निवडणुकीदरम्यान सत्तेचा दुरुपयोग कसा करता येतो, हे सर्वांनी अनुभवले. 

समाजकार्य सुरूच ठेवणार 
परंतु, या पराभवाने मी निराश झालेलो नाही. समाजकार्य करताना राजकारणातील पद असायलाच हवे, असे नाही. त्यामुळे आपल्या प्रभागासाठी, शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविणे सुरूच ठेवणार आहे. संपूर्ण निवडणुकीत मित्रपरिवाराने खूप मोलाची साथ दिली, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. निवडणुका, राजकारण हे एकामागून एक सुरू राहणार. महापालिका सभागृहात स्थान मिळवले नाही, मात्र लोकांच्या हृदयात ते नक्की निर्माण केले, असेही सपके शेवटी म्हणाले. 
------------ 
 

Web Title: स्थान