टोमॅटो उत्पादकांना 100 कोटींचा फटका

ज्ञानेश उगले 
बुधवार, 14 डिसेंबर 2016

शेतकऱ्यांना क्रेटमागे 50 रुपयांचा तोटा; गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात दहा पटींनी घसरण

शेतकऱ्यांना क्रेटमागे 50 रुपयांचा तोटा; गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात दहा पटींनी घसरण
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यात खर्च निघेल इतकाही दर नसल्याने टोमॅटो उत्पादकांचे अर्थकारणच कोलमडले. टोमॅटोला 20 किलोंसाठी 90 रुपयांपर्यंत उत्पादनखर्च असताना नाशिक जिल्ह्यातील बाजारात दररोज आवक झालेल्या चार लाख क्रेटला सरासरी अवघा 40 रुपये दर मिळाला. दररोज दोन कोटींचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला असून, जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांना किमान 100 कोटी रुपयांचा फटका बसला. बहुतांश टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटो पिकाची काढणी करून आधाराचे तार व बांबू गोळा करण्यास सुरवात केली आहे.

अर्थकारणच कोलमडले
बहुतांश तालुक्‍यांत 80 हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर टोमॅटोचे उत्पादन होते. यंदा त्यात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात टोमॅटोच्या 20 किलोंच्या क्रेटला 200 ते 900, तर सरासरी 400 रुपये दर मिळाले. त्यामुळे बाजारात चलन फिरून सोसायट्या व बॅंकांतील 90 कोटींच्या कर्जाची परतफेड डिसेंबरपर्यंत झाल्याने यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. यंदा प्रतिक्रेटला अवघा 20 ते 90 व सरासरी 40 रुपये दर मिळाल्याने दरात तब्बल दहा पटींनी उतरण झाली. दसऱ्यापासून हंगाम सुरू होतो. दिवाळीपर्यंत प्रतिक्रेटला 100 रुपयांचा दर होता; मात्र त्यानंतर दरात उतरणच होत गेल्याने संकटात भरच पडत गेली.

टोमॅटोच्या तोट्याचा द्राक्षांना धक्का
कृषिनिविष्ठा वितरकांकडे बहुतांश उधारीचे व्यवहार शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या उत्पन्नावर केलेले असतात. यंदा या टोमॅटोच्या शेतीवर अवलंबून असलेले पूरक व्यवसायही अडचणीत आले. टोमॅटोच्या उत्पन्नाचा द्राक्षाच्या भांडवली खर्चासाठी उपयोग होतो. यंदा टोमॅटो शेती तोट्यात गेल्यामुळे द्राक्षशेतीही संकटात सापडली.

उत्पादकता वाढूनही पदरी निराशाच पडली
वडनेरभैरव येथील टोमॅटो उत्पादक सुभाष पुरकर म्हणाले, की यंदा अधिक आधुनिक वाणांचा वापर केला आहे. त्यामुळे दोन महिन्यांनंतरही उत्पादनात चांगला जोम आहे. प्लास्टिक मल्चिंग, ठिबक यांसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळेही उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. एकरी 1200 क्रेटवरून 2500 क्रेटपर्यंत उत्पादकता वाढली आहे; मात्र खर्च निघेल इतकाही दर न मिळाल्याने पदरी निराशाच पडली आहे.

आधीच मंदी, त्यात वरून नोटाबंदी
व्यापाऱ्यांनी शेवटपर्यंत शेतकऱ्यांना जुन्याच पाचशेच्या नोटा दिल्यामुळे हाल वाढतच राहिले. अद्यापही बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून नवीन नोटा मिळत नसल्याचे चित्र आहे. जुन्या नोटा खपविण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनाच टार्गेट केल्यामुळे टोमॅटो उत्पादकांसमोरील संकटात भरच पडली.

"सह्याद्री'कडून दिलाशाचा प्रयत्न
टोमॅटोचे दर गडगडले असताना दिंडोरी तालुक्‍यातील मोहाडीच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांचा काही माल 60 रुपये क्रेटच्या दराने थेट खरेदी केला. यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला; मात्र बाजारातील मोठी आवक व सह्याद्री कंपनीची क्षमता यामुळे संपूर्ण माल सह्याद्रीच्या कॅम्पसवर नेणे अशक्‍य ठरले.

Web Title: 100 crore due to the tomato growers