बसच्या आगीतून वाचलेले दहा तोळे सोने दांपत्यास परत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

सर्व सामान जळाले. त्यामुळे सोने मिळेल, असे वाटले नव्हते. मात्र, इमानदारी दाखवत राखेत सापडलेले सोने परत केल्याने पोलिसांना धन्यवाद... 
- मीनाक्षी चौधरी, प्रवासी, पुणे 

मनमाड - जळत्या लक्‍झरी बसमध्ये मौल्यवान वस्तू खाक झाल्या, असे प्रवाशांना वाटत असतानाच आज मनमाड व चांदवड पोलिसांनी चक्क आगीत जळालेले दहा तोळे सोने पुणे येथे राहणाऱ्या प्रवाशांना परत केल्याने त्यांना सुखद धक्का बसला. पोलिसांची ही कामगिरी मनाला भावल्याचे मत पुणे येथील मीनाक्षी चौधरी यांनी व्यक्त केले. 

मनमाड-मालेगाव रोडवर कुंदलगाव येथे सोमवारी (ता. 27) मध्यरात्री ओमसाई ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी लक्‍झरी बस आणि वाहेगाव (ता. निफाड) येथील मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. धडकेमुळे आग लागून दोन्ही गाड्या खाक झाल्या. यात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. बसमधील प्रवासी वेळीच उतरले, मात्र त्यांचे सर्व सामान खाक झाले होते. जीव वाचविण्याच्या नादात सामान, मौल्यवान वस्तू गाडीत राहिल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने काहींनी बसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचे रौद्र रूप पाहून त्यांना थांबविण्यात आले. असाच प्रयत्न पुणे येथील मीनाक्षी चौधरी व सुशील चौधरी या दांपत्याने केला. मात्र, त्यांना इतर प्रवाशांनी अडविले. निराश होऊन पुणे येथे घरी परतलेल्या चौधरी यांना पोलिसांचा निरोप मिळताच त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. कारण, प्रवास करताना त्यांच्या बॅगेत तीन मंगळसूत्रे, चेन, कानातले टॉप असा दहा तोळ्यांचा ऐवज होता. तो दुसऱ्या दिवशी जळालेल्या राखेत सापडला. चौधरी यांनी अपघात झाला त्याच वेळेस पोलिसांना माहिती दिली होती. याच बसमध्ये दुसऱ्या महिलेचेही सोने जळाले होते. त्यामुळे या दोघींनाही बोलावून खात्री करून चौधरी यांना त्यांचे दहा तोळे सोने पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, मनमाडचे पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे, चांदवडचे पोलिस उपनिरीक्षक कैलास चौधरी यांनी परत केले. 

सर्व सामान जळाले. त्यामुळे सोने मिळेल, असे वाटले नव्हते. मात्र, इमानदारी दाखवत राखेत सापडलेले सोने परत केल्याने पोलिसांना धन्यवाद... 
- मीनाक्षी चौधरी, प्रवासी, पुणे 

Web Title: 100 gm Gold back to couple