येवल्यातील १०० टक्के प्राथमिक शाळा डिजिटल होणार : आशा साळवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

येवला : शिक्षक, ग्रामस्थ व ग्रामस्थाच्या योगदानाने तालुक्यातील सुमारे ९९ टक्के शाळा आजपर्यंत डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित शाळा लवकरच डिजिटल करून पूर्ण तालुक्यातील शाळा डिजिटल करण्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती आशाताई साळवे यांनी केले.

येवला : शिक्षक, ग्रामस्थ व ग्रामस्थाच्या योगदानाने तालुक्यातील सुमारे ९९ टक्के शाळा आजपर्यंत डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित शाळा लवकरच डिजिटल करून पूर्ण तालुक्यातील शाळा डिजिटल करण्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती आशाताई साळवे यांनी केले.

सर्व शिक्षा अभियान, जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व लोकजागृती अभियान उपक्रमांतर्गत येथील पंचायत समितीच्या वतीने बुधवारी बाभूळगाव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रेरणा सभेचे आयोजन  करण्यात आले होते. सभापती साळवे यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन करण्यात येऊन उद्घाटन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

शिक्षण विस्तारअधिकारी प्रेरणा सभेत शिक्षणातून समतेकडे या माध्यमातून लेक वाचवा, लेक शिकवा या अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा या उपक्रमाबद्दल  महालखेडा शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर पायमोडे यांनी मार्गदर्शन केले. मुलाच्या जन्माचे स्वागत जसे पेढे वाटून करतात तसेच स्वागत मुलीच्या जन्माचे झाले तर मुलामुलींन मधील भेद दुर होण्यास मदत होईल. हा उपक्रम आता तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात यावा असा मनोदय यावेळी पायमोडे यांनी व्यक्त केला.

लोकसहभागातून शाळेचा विकास या विषयावर वसंत निघुट यांनी तर विजयसिंह परदेशी यांनी तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात प्रभावीपणे वापर कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय आवडीचा व्हायला हवा त्यासाठी अध्ययन- अध्यापन पद्धती विषयी तालुका टॅग काॅर्डिनेटर प्रशांत शिंदे व मुखेड शाळेचे दत्तात्रय उगले यांनी मार्गदर्शन केले. 

चिचोंडी बु शाळेच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी ड्रामा, माॅरल स्टोरी, संभाषण, मुलाखत इत्यादी कृतीका सुंदर पध्दतीने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सभापती साळवेच्या हस्ते पायमोडे, निघुट, परदेशी, शिंदे, उगले, सिमा खालकर, राम कुलकर्णी, पुंडलिक गावंदे तसेच चिचोंडीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विस्तार अधिकारी मंदाकिनी लाडे यांनी प्रास्ताविक केले व केंद्रप्रमुख किसन पवार यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षण विस्तार अधिकारी  मंगला कोष्टी, कैलास रोढे, शेख, निलेश जाधव, हरिश्चंद्रे यासह तालुक्यातील  सर्व जि.प.शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी  उपस्थित होते. गटविकास अधिकारी सुनिल आहिरे, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मंदाकिनी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा उत्साहात पार पडली.

Web Title: 100 percent primary schools become digital in yeola said by asha salave