कर्जमाफीपासून बारा हजार शेतकरी वंचित 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 22 जून 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : शासनाच्या शिवाजी महाराज सन्मान योजनेतंर्गत चाळीसगाव तालुक्‍यातील 11 हजार 853 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मेहुणबारे (चाळीसगाव) : शासनाच्या शिवाजी महाराज सन्मान योजनेतंर्गत चाळीसगाव तालुक्‍यातील 11 हजार 853 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वंचितांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील एकूण 22 हजार 355 शेतकऱ्यांना 98 कोटी 13 लाख रुपये कर्जमाफीची रक्कम सद्यःस्थितीत आलेली आहे. असे असले तरी चाळीसगाव तालुक्‍यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरूनही कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या यादीत शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत. त्यामुळे खरिपाची पेरणी व बी- बियाणे खरेदीसाठी बळीराजाला सावकाराचीच पायरी चढावी लागणार आहे. शासनाने कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करताना अतिशय किचकट निकष लावले होते. त्यातही सहकार विभागाचे पाहिजे तसे नियोजन नव्हते. परिणामी, एक वर्षापासून कर्जमाफीच्या कामाचा घोळ सुरूच आहे. या भोंगळ कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे. 

सहकार विभागाची डोकेदुखी 
शासनाने मागवलेली माहिती सोसायटींच्या सचिवांनी शासनाला सादर केली. मात्र, तरीही तीस टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. इतर गावांतील शेतकऱ्यांना लाभ मिळाला व आम्हाला का नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे शासनाने केलेली कर्जमाफी सहकार विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. शासनाला पारदर्शकपणे कर्जमाफीचा लाभ देता आला नाही, असा आरोप शेतकरी करीत आहेत. 

रकमांचा घोळ 
मागीलवर्षी दिवाळी भेट म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन या योजनेचा शासनाने मोठा गाजावाजा केला. मात्र, प्रत्यक्षात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यात एका आधार क्रमांकावर अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय एका यादीत अनेकदा कर्जाची मूळ रक्कम आणि थकीत रक्कम यांच्यात ताळमेळच बसत नसल्याने रकमेचा घोळ झाल्याचे दिसून येत आहे. 

याद्या दुरुस्तीचा घोळ थांबणार कधी? 
दिवाळीपासून कर्जमाफीचे काम सुरू असल्याने सोसायटींच्या सचिवांच्या हे काम नाकीनऊ आले आहे. दोन दिवसापासून जिल्ह्यावरुन आलेल्या दुरुस्तीच्या पात्र व अपात्र सभासदांच्या याद्यांचे "ऑनलाइन' काम सुरू आहे. एकूणच ही सर्व प्रक्रिया किचकट असल्याने सचिवांसह जिल्ह्यावरील अधिकारी वैतागले आहेत. त्यामुळे याद्या दुरुस्तीचा घोळ थांबणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

एकूण विकास सोसायट्या - 81 
कर्जमाफीचे पात्र सभासद - 34,208 
दीड लाखाच्या आत कर्जमाफ झालेले - 11,174 (रुपये ः 7 कोटी 56 लाख) 
नियमित कर्जभरणा करणारे सभासद - 9,229 (रुपये ः 25 कोटी 43 लाख) 
दीड लाखाच्या वर कर्जमाफ झालेले - 1,889 (रुपये ः 12 कोटी 13 लाख)

Web Title: 12 thousand farmers are away from loan relief