जळगाव जिल्ह्यात बाराशेवर शेततळी तयार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

अडीच कोटींवर निधी वितरित; 1242 "टीसीएम' पाणी साठणार

अडीच कोटींवर निधी वितरित; 1242 "टीसीएम' पाणी साठणार
जळगाव - जलसंधारणाचा उत्कृष्ट उपाय असलेल्या "मागेल त्याला शेततळे' योजनेंतर्गत जिल्ह्यात शेततळे तयार करण्याच्या योजनेच्या उद्दिष्ट साध्यतेकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार 221 शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यापोटी शेतकऱ्यांना दोन कोटी 68 लाख 33 हजारांचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यात दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्या माध्यमातून 1242.77 टीसीएम साठवणक्षमता निर्माण होणार आहे.

"मागेल त्याला शेततळे' योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. यात कृषी विभागाच्या जळगाव उपविभागात 470, अमळनेर उपविभागात 790, तर पाचोरा उपविभागात 740, अशी दोन हजार शेततळी तयार करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. शेततळ्यांसाठी चार कोटी 29 लाख 33 हजारांचा निधी लागणार आहे. पैकी दोन कोटी 68 लाखांचा निधी वाटप झाला आहे.

सध्या जळगाव उपविभागात 176, अमळनेर उपविभागात सर्वाधिक 380, तर त्याखालोखाल पाचोरा उपविभागात 320 शेततळी तयार करण्यात आली आहेत. अशी जिल्ह्यात 876 शेततळी करण्यात आली असून, सद्यःस्थितीत 242 शेततळी पूर्णत्वाकडे आहेत आणि उर्वरित शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.

शेततळ्यांचे सात प्रकार
शेततळ्यांचे आकारानुसार सात प्रकार आहेत. त्यात आकार 30 बाय 30 बाय 3 मीटर असेल, तर 2.196 "टीसीएम' पाणीसाठा क्षमता निर्माण होते. 30 बाय 25 बाय 3 मीटर आकाराच्या शेततळ्यात 1.791 "टीसीएम', 25 बाय 25 बाय 3 मीटर आकाराच्या शेततळ्यात 1.461 "टीसीएम', 25 बाय 20 बाय 3 मीटर आकाराच्या शेततळ्यात 1.131 "टीसीएम', 20 बाय 20 बाय 3 मीटर आकाराच्या शेततळ्यात 0.876 "टीसीएम', 20 बाय 15 बाय 3 मीटर आकाराच्या शेततळ्यात 0.621 "टीसीएम', 15 बाय 15 बाय 3 मीटर आकाराच्या शेततळ्यात 0.441 "टीसीएम' याप्रमाणे जलसाठ्याची क्षमता निर्माण होते. शेततळ्याच्या आकारमानानुसार 22 हजार ते 50 हजारांपर्यंत अनुदान दिले जाते.

असा घ्या योजनेचा लाभ
ज्या शेतकऱ्यांना शेततळे योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल, त्यांनी https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा.

जिल्ह्यात आतापर्यंत योजनेंतर्गत 1221 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. 255 शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. दोन हजार शेततळी पूर्ण करण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
- विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधीक्षक

तालुकानिहाय उद्दिष्ट व पूर्ण झालेली शेततळी
तालुका उद्दिष्ट पूर्ण झालेली शेततळी
जळगाव-- 130--52
भुसावळ-- 65--26
बोदवड--60--16
यावल--100--21
रावेर--35--23
मुक्ताईनगर--80--38
अमळनेर--450--213
चोपडा--40--25
एरंडोल--70--43
धरणगाव--60--7
पारोळा--170--92
चाळीसगाव--285--91
जामनेर--300--155
पाचोरा--115--60
भडगाव--40--14

Web Title: 1200 farm lake in jalgav