वर्षभरात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १५ टक्के अल्पवयीन

नरेश हाळणोर
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

नाशिक - आपापसांतील भांडण, छळवणूक, प्रेमभंग, आजार व ताणतणाव यांसारखी कारणे आत्महत्येसारखी टोकाची भूमिका स्वीकारण्यास कुठल्याही व्यक्तीला भाग पाडतात. गेल्या वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकली, तर २८३ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्यांत १५ टक्के प्रमाण हे अल्पवयीन, तर २० ते ५० वयोगटाचे ८० टक्के आहे. 

नाशिक - आपापसांतील भांडण, छळवणूक, प्रेमभंग, आजार व ताणतणाव यांसारखी कारणे आत्महत्येसारखी टोकाची भूमिका स्वीकारण्यास कुठल्याही व्यक्तीला भाग पाडतात. गेल्या वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकली, तर २८३ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्यांत १५ टक्के प्रमाण हे अल्पवयीन, तर २० ते ५० वयोगटाचे ८० टक्के आहे. 

तरुणवर्गावरील मानसिक ताणतणाव आणि बेरोजगारी समस्येची भीषणता स्पष्ट होते. अल्पवयीन मुला-मुलींचे आत्महत्येमागील कारण हे बहुतांशी प्रेमप्रकरणाशी निगडित आहे. एखाददुसऱ्या घटनेत अभ्यासाच्या ताणतणावातूनही जीवनयात्रा संपविल्याचे स्पष्ट होते. अल्पवयीन मुलांचे आत्महत्येतील वाढते प्रमाण मात्र चिंतेचा विषय आहे. मानसिक कमकुवतपणा हे वैद्यकीयदृष्ट्या कारण असले, तरी सततच्या नैराश्‍यातून वा सतत काही महिने-दिवस त्रास सहन केल्यानंतरही मार्ग न दिसल्याने हे पाऊल उचलल्याचे आढळले आहे.

समुपदेशनातून परावृत्त
आत्महत्येचा प्रयत्न वा त्याचा विचार मनात घोळत असतानाच काही जण मानसोपचारतज्ज्ञाकडे गेले. त्यामुळे त्यांना वेळीच समुपदेशन मिळाल्याने ते आत्महत्येपासून परावृत्त झाले. जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात गत वर्षभरात तब्बल ८२४ जणांचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.

आत्महत्येचे प्रमाण - 
  अल्पवयीन : १५ टक्के 
  २० ते ५० वयोगट : ८० टक्के 
  पुरुष : ६० टक्‍के 
  महिला : ४० टक्के 
  कौटुंबिक कारणातून : ७० टक्के 
  आजारपणाला कंटाळून : ५ टक्‍के 

२०१८ मधील आत्महत्या -
जानेवारी : २० (गळफास- १६, विषप्राशन- ४)
फेब्रुवारी : २० (गळफास- १७, विषप्राशन- ३)
मार्च : २० (गळफास- १७, विषप्राशन- ३)
एप्रिल : ३० (गळफास- २०, विषप्राशन- १०)
मे : १९ (गळफास- १४, विषप्राशन- ५)
जून : २५ (गळफास- १९, विषप्राशन- ६)
जुलै : ३२ (गळफास- २२, विषप्राशन- १०)
ऑगस्ट : २३ (गळफास- १५, विषप्राशन- ८)
सप्टेंबर : २४ (गळफास- १४, विषप्राशन- १०)
ऑक्‍टोबर : १९ (गळफास- २५, विषप्राशन- ९)
नोव्हेंबर : ३० (गळफास- २३, विषप्राशन- ७)
डिसेंबर : २१ (गळफास- १९, विषप्राशन- २)

समस्येचे स्वरूप कोणतेही असो, तरुणांमध्ये संयम (पेशन्स) राहिलेला नाही. जे हवे ते लगेचच. त्यातून आलेले अपयश, नैराश्‍य त्यास आत्महत्येकडे नेते. वेळीच संवाद साधला तर त्यातून परावृत्त करणे शक्‍य आहे. तरीही ताणतणाव, नैराश्‍य व संयम नसणे हीच आत्महत्येमागील मुख्य कारणे आहेत. 
- डॉ. नीलेश जेजूरकर, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: 15 percent Minor suicide in the year