कवितेच्या गावी रमली मुले

सुनील शेडगे
सोमवार, 20 मे 2019

भुर भुर भुरभुर मोटारगाडी
कवितेच्या गावाला आम्हाला धाडी 
उडते पक्षी पाहूया 
कवितेच्या गावाला जाऊया

सुट्टी हा मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बहुतेकदा सुट्टीच्या काळात मुलांचा मामाच्या गावाला जायचा बेत पक्का असतो. या सुट्टीत मात्र मुलांनी मामाच्या गावाऐवजी कवितेच्या गावाला पसंती दिली. या गावात मुले रमून गेली.

नागठाणे :
भुर भुर भुरभुर मोटारगाडी
कवितेच्या गावाला आम्हाला धाडी 
उडते पक्षी पाहूया 
कवितेच्या गावाला जाऊया

सुट्टी हा मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बहुतेकदा सुट्टीच्या काळात मुलांचा मामाच्या गावाला जायचा बेत पक्का असतो. या सुट्टीत मात्र मुलांनी मामाच्या गावाऐवजी कवितेच्या गावाला पसंती दिली. या गावात मुले रमून गेली.

जकातवाडी हे सातारा शहरालगतचे गाव. अलीकडच्या काळात 'कवितांचे गाव' म्हणून ते नावारूपाला आले आले. विविध दिग्गज साहित्यिकांनी या गावास भेटी दिल्या आहेत. कविता या विषयाला जोडून विविध उपक्रमांची कार्यवाही इथे यशस्वीपणे सुरू आहे. ही सुट्टीदेखील त्याला अपवाद नव्हती. त्या अनुषंगाने मुलांसाठी 'कवितेच्या गावा'ची सैर आयोजित करण्यात आली. त्यात बहुसंख्येने मुले सहभागी झाली.
चित्रकार राम सूर्यवंशी यांनी मुलांना चित्रकलेचे धडे दिले. कवितांचे रेखाटन कसे करावे, याबाबतही त्यांनी मुलांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सहजसुलभ भाषेत कविता कशा तयार कराव्यात हे सांगितले. त्यामुळे मुलांचे भावविश्व कविता बनून गावातील घरांच्या भिंतीवर उतरले.

सूर्यवंशी यांनी जादूच्या प्रयोगातून मनोरंजन, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन यांची प्रात्यक्षिकेही दाखविली. कार्यक्रमास विद्यावर्धिनी वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे, कार्यवाह सुनील लोंढे , ग्रंथालय भारतीचे विश्वास नेरकर, सरपंच चंद्रकांत सणस, कला शिक्षक तारू, गणेश कोकरे आदी उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिक दळवी, वैष्णवी मोहिते, शुभम पारटे, निर्मला लोंढे, वैशाली पारटे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी सोनाली कुलकर्णी, व्यंकटेश कुंभारे, दत्तात्रय काळे, मुग्धा कुंभारे, प्रसाद कुंभारे आदींनी पुण्याहून हजेरी लावली होती.

"मुलांच्या अभिव्यक्तीला योग्य दिशा दिली तर ती आपल्या आवडीच्या प्रांतात रमून जातात. कवितेच्या गावात त्याचीच अनुभूती प्रत्ययास आली."
- प्रल्हाद पारटे, उपक्रम समन्वयक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा