पाच लाख वारकऱ्यांना देणार रेनकोट, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मनोज गायकवाड
बुधवार, 19 जून 2019

श्रीपूर : संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या पाच लाख वारकऱ्यांना पावसाचा होणारा त्रास लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीच्या माध्यमातून दोन टप्प्यात या रेनकोटचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी दिली. 

श्रीपूर : संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या पाच लाख वारकऱ्यांना पावसाचा होणारा त्रास लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीच्या माध्यमातून दोन टप्प्यात या रेनकोटचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी दिली. 

विठूरायाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना शासन विविध सुविधा पुरवित असते. गेल्यावर्षी ऐन पालखी प्रस्थानाच्या तोंडावर शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी प्लास्टिक कागद वापरण्याबत साशंकता निर्माण झाली होती. वारकऱ्यांची ही अडचण लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना प्लास्टिक बंदीच्या निर्णयातून मुक्ती दिल्याने वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पुढील वर्षी विठूरायांच्या भक्तांना पावसापासून दिलासा मिळावा यासाठी आम्ही सेवारुपाने काही तरतूद करु असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आता रेनकोट वितरणाच्या माध्यमातून त्यांनी या शब्दाची पूर्तता केली आहे. याबाबत माहिती देताना भारतीय म्हणाले, दरवर्षी आषाढी वारीसाठी वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे धाव घेतात. यंदा पाऊस लांबला असला तरी, आषाढ महिन्यात महाराष्ट्रात पाऊस कोसळत असतो. वारकऱ्यांना पावसात मार्गक्रमण करावे लागते.

वारीत सहभागी होणारे बहुतांश वारकरी हे शेतकरी, कामगार व मजूर वर्गातील असतात. बहुतांश वारकऱ्यांना छत्री किंवा रेनकोट खरेदी करणे परवडणारे नसते. त्यामुळे निर्मल वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांना रेनकोट देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मानाच्या सात पालख्यांसह राज्यातील पन्नास पालखी सोहळ्यातील वारकऱ्याना रेनकोट दिले जाणार आहेत. त्यात मध्यप्रदेशातील भाकरे महाराज पालखी सोहळ्यासह अमरावती जिल्ह्यातील महंमदखानबाबा पालखी सोहळ्याचा देखील समावेश आहे. सुमारे तीस हजार स्वयंसेवक त्यासाठी मदत करीत आहेत. मंगळवारी (ता. 18) संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. यावेळी रेनकोट वाटपाचा प्रारंभ करण्यात आला आहे. देहू येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज सोहळा प्रस्थानाच्यावेळी पहिल्या व ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याचे सासवड येथे आगमन झाल्यावर दुसऱ्या टप्प्यातील रेनकोट वाटप केले जाणार आहे. 

मुख्यमंत्री स्वतः वारीचे पाईक आहेत. त्यामुळे, त्यांना वारकऱ्यांच्या अडचणींची जाणीव आहे. वारकऱ्यांना रेनकोट देऊन त्यांनी गेल्यावर्षी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे. या योजनेचे आम्ही स्वागत केले असून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे रुणी आहोत. 
- संजय धोंडगे, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख. 

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात वारीची परंपरा आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी नेहमीच खारीचा वाटा उचलण्याची त्यांची त्यांची धारणा आहे. गेल्यावर्षी त्यांनी वारकऱ्यांना प्लास्टिक बंदीतून मुक्ती दिली होती. यावर्षी वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी रेनकोट देऊन त्यांनी शब्द खरा केला आहे आणि विठ्ठलचरणी आपली सेवा रुजू केली आहे. 
- श्रीकांत भारतीय. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा