25 लाखांची लॉटरीचे आमिष दाखवून 27 लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नाशिक - पाकिस्तानातून फोन करीत संशयिताने देवळाली कॅम्प परिसरातील महिलेस 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून, ती रक्कम मिळविण्यासाठी तिला 27 लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराने सदरील महिलेचे मानसिक स्थितीही ढासळली असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक - पाकिस्तानातून फोन करीत संशयिताने देवळाली कॅम्प परिसरातील महिलेस 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून, ती रक्कम मिळविण्यासाठी तिला 27 लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराने सदरील महिलेचे मानसिक स्थितीही ढासळली असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोना फारूख इराणी (रा. भगवानसिंग बंगला, संसरी नाका, लॅमरोड, देवळाली कॅम्प) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. 54 वर्षीय मोना या पतीसह बंगल्यास राहतात तर त्याच्या दोन मुली परदेशात वास्तव्याला आहेत. त्यांचे शालिमार चौकात हॉटेल असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मोना इराणी यांना गेल्या 8 एप्रिल 2013 रोजी त्यांच्या मोबाईलवर 092 या क्रमांकाने सुरू होणाऱ्या मोबाईलवरून फोन आला. संशयिताने मोना यांना 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितल असता, त्यावेळी त्यांनी त्यावर विश्‍वास ठेवला नाही. परंतु परत संशयिताने फोन करून लॉटरी लागल्याचे सांगत, लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी काही रक्कम (सायनिंग अमांऊट) भरल्यास, लॉटरीची रक्कम तात्काळ मिळणार असे सांगत त्यांचा विश्‍वास संपादन केला. 

त्यानुसार मोना इराणी यांनी एप्रिल 2013 ते ऑगस्ट 2018 या दरम्यान, संशयिताने सांगितल्याप्रमाणे 10 हजार रुपयांपासून ते 2/3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्याच्या बॅंक खात्यावर जमा केली. पैसे नसताना, मोना यांनी घरातील दागदागिने विकले. नातलगांकडून उसनवार पैसे घेतले. एवढचे नव्हे तर परदेशात असलेल्या मुलींकडूनही पैसे मागवून तिने संशयिताच्या बॅंक खात्यावर आत्तापर्यंत 26 लाख 95 हजार 169 रुपये जमा केले आहेत. पैसे भरल्याच्या त्यांच्याकडे 86 पावत्या आहेत. मात्र, लॉटरीसंदर्भातील कोणतीही माहिती त्यांनी मुलींना वा नातलगांना दिली नाही. सतत पैसे भरूनही लॉटरीची रक्कम न मिळाल्याने हवालदिल झालेल्या मोना इराणी यांनी संशयितांकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आर्थिक कर्जबाजारीपणामुळे मोना इराणी यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आहे. 

फोन पाकिस्तानातूनच 
मोना इराणी यांना आलेला फोन पाकिस्तानातून आला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 092 या क्रमांकाने सुरू होणारी मोबाईल क्रमांकाची आंतरराष्ट्रीय सिरिज पाकिस्तान या देशाची आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांनी तपास सुरू केला असून संशयिताच्या बॅंकखात्याची माहिती संकलित केली जात आहे.

Web Title: 27 lakhs by showing lottery bait for 25 lakhs