धुळ्यात लोकसहभातून बसविले 32 सीसीटीव्ही कॅमेरे 

निखिल सूर्यवंशी
रविवार, 23 सप्टेंबर 2018

धुळे : विधायक कार्यासाठी साडेतीनशे तरुण संघटित झाले आणि त्यांनी वंदे मातरम प्रतिष्ठानची धुळे शहरात स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंतीसह वृक्ष लागवड, स्वच्छतेच्या कार्यात झोकून दिले. असे असताना त्यांनी महिला, तरूणींसह आपापल्या कॉलनी परिसरातील ऐरणीवर आलेला सुरक्षिततेचा प्रश्‍न हाताळण्यास सुरवात केली. त्यात लोकसहभागातून प्रारंभी 32 सीसीटीव्ही (आयपी) कॅमेरे चौकाचौकात लावण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ वंदे मातरम प्रतिष्ठानने केला. 

धुळे : विधायक कार्यासाठी साडेतीनशे तरुण संघटित झाले आणि त्यांनी वंदे मातरम प्रतिष्ठानची धुळे शहरात स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंतीसह वृक्ष लागवड, स्वच्छतेच्या कार्यात झोकून दिले. असे असताना त्यांनी महिला, तरूणींसह आपापल्या कॉलनी परिसरातील ऐरणीवर आलेला सुरक्षिततेचा प्रश्‍न हाताळण्यास सुरवात केली. त्यात लोकसहभागातून प्रारंभी 32 सीसीटीव्ही (आयपी) कॅमेरे चौकाचौकात लावण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ वंदे मातरम प्रतिष्ठानने केला. 

जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. इंदिरा गार्डनजवळील चार कॅमेऱ्यांच्या स्टॅंडपोस्टचे फित कापून औपचारिक उद्‌घाटन झाले. वंदे मातरम प्रतिष्ठानच्या लोकसहभागातील या कार्याची मान्यवरांनी प्रशंसा केली. या प्रकल्पाची उपयुक्तता विशद करताना मान्यवरांनी राज्यासाठी हा सुरक्षेबाबतचा वंदे मातरम प्रतिष्ठान पॅटर्न पथदर्शी ठरणारा असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे प्रतिष्ठानच्या सदस्यांचा हुरूप वाढला आहे.
 
वंदे मातरम प्रतिष्ठानने वायरलेस 32 "आयपी' कॅमेरे बसविण्यास सुरवात केली आहे. तीन किलोमीटर परिघातील सर्व कॅमेऱ्यांव्दारे टिपल्या जाणाऱ्या हालचाली प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयातील संगणकीय प्रणालीवर पाहता येतील. याव्दारे प्रतिष्ठानचे सदस्य निगराणी ठेवू शकतील. विशेष म्हणजे वायरलेस कॅमेरा प्रणालीचे कनेक्‍शन पोलिस अधीक्षक कार्यालय, पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याला दिले जाणार आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी स्थितीची निगराणी करू शकतील. या प्रणालीची क्षमता सात किलोमीटरपर्यंत आहे. त्यानुसार या परिघातील कॉलनी, चौक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात समाविष्ट होऊ शकतील.

वंदे मातरम प्रतिष्ठानकडे गेल्या वर्षातील सव्वाचार लाखांचा निधी शिल्लक होता. तो गृहीत धरून सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प साडेपाच लाखांच्या खर्चातून साकारला जात आहे. यापूर्वी प्रतिष्ठानचे प्रोत्साहन आणि लोकसहभागातून जयहिंद कॉलनी, इंदिरा गार्डन परिसरात काही नागरिकांच्या निवासस्थालगत 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सोनसाखळी चोर पोलिसांना गवसला होता. या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदींमुळे वाढती वर्दळ पाहता महिला, तरूणींसह आपापला भाग सुरक्षित राहण्यासाठी वंदे मातरम प्रतिष्ठानने राबविलेला हा प्रकल्प अनुकरणीय, पोलिसांना मदतीचा ठरणारा आहे, असे पोलिस अधीक्षक पांढरे यांनी सांगितले.

गणेशोत्सवातील या प्रकल्पाच्या लोकार्पणावेळी नगरसेविका प्रतिभाताई चौधरी यांच्यासह पुढाकार घेणारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, कृपेश नांद्रे, सुमीत बोरसे, गिरीश मराठे, सागर चौधरी, अमित दुसाने, कमलेश देवरे, सुधीर बोरसे, मिलिंद बोरसे, भारत वाघ, सुनील पाटील, अमोल चौधरी, संजय ठाकरे, संदीप पंडितराव पाटील, नीलेश राजपूत, हरीश चौधरी उपस्थित होते. एकूण शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. 

Web Title: 32 CCTV cameras installed in Dhule