‘सिव्हिल’च्या शवागारात सात महिन्यांपासून ३४ मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

नवीन मृतदेहांना जागाच नाही
जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ५६ शवपेट्या आहेत. त्यापैकी ३४ शवपेट्यांमध्ये हे बेवारस मृतदेह सात महिन्यांपासून पडून आहेत. उर्वरित शवपेट्यांपैकी काही शवपेट्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे नव्याने येणाऱ्या मृतदेहांना ठेवण्यासाठी शवागारात जागाच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

नाशिक - जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात शहर-ग्रामीण पोलिस आणि महापालिकेच्या अनास्थेमुळे सात महिन्यांपासून ३४ बेवारस मृतदेह पडून आहेत. यातील बहुतांश मृतदेहांची निर्धारित वेळेत विल्हेवाट न लावल्यामुळे ते कुजले आहेत. दुर्गंधीमुळे शवागारातील कर्मचारी, रुग्णालय परिसर आणि आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 

शहर-जिल्हा परिसरात अनेकदा अनोळखी मृतदेह आढळून येतात, असे मृतदेह शहर-जिल्हा पोलिसांकडून जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवले जातात. त्या मृतदेहांची निर्धारित १४ दिवसांत ओळख पटवून त्यांची विल्हेवाट लावायची असते. महापालिका क्षेत्रात गंगाघाट, सीबीएस, ठक्कर बझार परिसरात बहुतांश भिकाऱ्यांचेच मृतदेह सापडतात, त्यांची ओळख पटविणे जिकिरीचे होते. त्यामुळे पोलिसांकडून त्यांचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठवला जातो. त्या अहवालानंतर महापालिकेकडून संबंधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र काही महिन्यांपासून शवागारात असलेल्या बेवारस मृतदेहांचे अहवालच महापालिकेला पाठविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात सात महिन्यांपासून ३४ बेवारस मृतदेह पडून आहेत. यात ग्रामीण पोलिसांकडील १४, शहर पोलिसांकडील २० मृतदेहांचा समावेश आहे. या मृतदेहांचा अहवालच पोलिसांनी महापालिकेला अद्याप पाठवलेला नाही. ज्या मृतदेहांचे अहवाल पाठविले, ते महापालिकेच्या आरोग्य विभागापर्यंत पोचलेले नाहीत.

शवागारातील मृतदेह कुजले असून, त्यांची दुर्गंधी येत आहे. शवागार परिसरात नियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न त्यामुळे गंभीर होत आहे. या मृतदेहांची दुर्गंधी रुग्णालय परिसर, आसपासचा रहिवासी परिसर आणि ठक्कर बझार बसस्थानक परिसरात पसरत आहे. त्यामुळे येथील आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. 

महापालिकेची अनास्था
शवागारात दाखल होणाऱ्या बेवारस मृतदेहांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाते. मात्र काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाचे शिक्के व कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून महापालिकेकडून कर्मचारी नियुक्त नव्हता. नवीन कर्मचारी नियुक्तीला दिला. परंतु कागदपत्रांच्या गोंधळामुळे महापालिकेला अहवालच मिळत नसल्याने या मृतदेहांची विल्हेवाट वेळेत होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 34 dead body in civil hospital from last 7 months