धुळ्यात चार पूल पाण्याखाली

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मुडीला शंभर कुटुंब स्थलांतरित
मुडी बोडर्दे (ता. अमळनेर) येथील पांझरा नदीच्या पुराचे पाणी गावापर्यंत आले असून, ग्रामपंचायतीला पाण्याचा वेढा पडला आहे. दरम्यान, प्रशासनाने गावातील शंभर कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्यासह पोलिसांचे पथक गावात तळ ठोकून होते.

धुळे - पांझरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने आज दुपारी प्रकल्पाचे सर्व १७ दरवाजे उघडून पांझरा नदीत प्रतिसेकंद ३० हजार क्‍यूसेसने विसर्ग करण्यात आला. यामुळे आज पांझरा नदीला मोठा पूर आला. पुराचे हे पाणी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरात पोहोचले. पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने रात्री आठच्या सुमारास शहरातील फरशी पुलासह चार पूल पाण्याखाली गेले. गेल्या काही वर्षांत पांझरा नदीला आलेला हा सर्वांत मोठा पूर ठरला. हा पूर पाहण्यासाठी पांझरेच्या दोन्ही काठांवर नागरिकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, पांझरा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्‍वभूमीवर तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हा प्रशासनाने उद्या (ता. ५) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली. तसेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

जिल्ह्यासह शहराला आज दमदार पावसाने झोडपले. या पावसाने जिल्ह्यातील अनेक छोटी-मोठी धरणे ओसंडली. पांझरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे सर्व १७ दरवाजे उघडले. यातून प्रतिसेकंद ३० हजार क्‍यूसेसने पांझरा नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने नदीला मोठा पूर आला. सायंकाळी हे पाणी शहरात दाखल झाले आणि पाहता-पाहता पांझरा नदीवरील गणपती पूल, महाकाली मंदिराजवळील पाइप मोरी व सावरकर पुतळ्याजवळील छोटा पूल, एकवीरादेवी मंदिराजवळील पूल पाण्याखाली गेले. पाण्याची पातळी वाढतच गेल्याने काही मिनिटांतच पांझरा काठावरील शिवाजी रोडवरील अंजान शाह दर्ग्यापर्यंत पाणी पोहोचले. या रस्त्यावरही गुडघ्यापर्यंत पाणी आले होते. यामुळे चारही पुलांवरून वाहतूक बंद करत पोलिसांना तैनात करण्यात आले.

मंदिरात पाणी, पोलिस ठाणेही वेढले
पुराचे पाणी पांझरा काठावरील कालिकामाता मंदिरातही शिरले. एकवीरादेवी मंदिराजवळील देवपूर पोलिस ठाण्यालाही पाण्याचा वेढा पडला होता. 

साक्री तालुक्‍यात घरांची पडझड
साक्री - तालुक्‍यात गेल्या २४ तासांत सर्वदूर झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच भागांतील नदी- नाल्यांना मोठा पूर आला आहे. एक- दोन अपवाद वगळता सर्वच पूल पाण्याखाली गेले आहेत. यातच लाटीपाडा (पांझरा), मालनगाव व जामखेली हे तीनही मोठे प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ होऊन पाणी नदीत येत असल्याने तालुक्‍यात एक-दोन दिवस पूर परिस्थिती कायम राहण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, तालुक्‍यातील अनेक गावांत घरांची पडझड झाली असून, दहिवेल (ता. साक्री) येथे घर कोसळल्याने दहा वर्षांची मुलगी जखमी झाली. तालुक्‍यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लाटीपाडा (पांझरा), मालनगाव व जामखेली हे तिन्ही मध्यम प्रकल्प व अन्य सर्व लहान-मोठे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.

यातच आज दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे लाटीपाडा प्रकल्पातून २४ हजार ४०० क्‍यूसेस, जामखेली प्रकल्पातून १५ हजार २९५ क्‍यूसेस, तर मालनगाव प्रकल्पातून चार हजार ४७० क्‍यूसेसने नदीपात्रात विसर्ग होत आहे. यामुळे पांझरा, कान व जामखेली या तिन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 Bridge Underwater in Dhule District Rain