बापरे! हयात व्यक्ती मृत दाखवून लाटली 4 हेक्टर जमीन...? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Land scam

बापरे! हयात व्यक्ती मृत दाखवून लाटली 4 हेक्टर जमीन...?

धुळे : हयात व्यक्ती मृत दाखवून चार हेक्टर ४२ आर शेतजमीन लाटल्याची तक्रार नेर (ता. धुळे) येथील संतोष आनंदा भिल (निकुंभ) यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. न्यायासाठी त्यांनी तीव्र लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे, की आजोबा (वडिलांचे वडील) फकीरा हुसेन भिल (निकुंभ) यांचा १५ एप्रिल १९९६ ला मृत्यू झाला. त्याची रिसरत नोंद पंचायत समितीस्तरावर ४ ऑक्टोबर २००७ ला केली. या कुटुंबाचा गैरफायदा घेत आनंदा पवार, पवन पवार व इतर दोन जणांनी कुठलेही नातेसंबंध नसताना ग्रामपंचायतीमधील काही कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून आजोबांच्या मृत्यूची १९ सप्टेंबर १९८४ अशी खोटी नोंद केल्याची तक्रार आहे. वास्तविक, तेव्हा आजोबा हयात होते. तरीही १९८४ मधील खोट्या मृत्यूच्या नोंदीचे तसे प्रमाणपत्र ५ सप्टेंबर २०१० तयार करून घेतले. खोटे प्रतिज्ञापत्र बनवून आजोबांच्या नावे असलेली गट नंबर ४८ मधील चार हेक्टर ४२ आर शेतजमीन संगनमताने भिल परिवाराची फसवणूक करणाऱ्यांनी २०१९ ला खोट्या दस्तावेजाव्दारे स्वतःच्या नावे करून घेतली. त्या जमीनीवर कर्जही काढले. भिल परिवाराची वारस हक्काची शेतजमीन परत मिळावी यासाठी ग्रामपंचायतीच्या दप्तरी असलेली आजोबांच्या मृत्यूची १९ सप्टेंबर १९८४ अशी खोटी नोंद रद्दबातल करावी. या प्रकरणी सखोल चौकशीसह दोषी कर्मचारी व तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदार संतोष भिल यांनी केली.