खासगी शाळांतील चार शिक्षक अतिरिक्‍त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

धुळे - जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये यंदाच्या विद्यार्थिसंख्येच्या सर्वेक्षणानंतर चार शिक्षक अतिरिक्‍त झाले आहेत. मागील वर्षाचे २७ अतिरिक्‍त शिक्षकांचे समायोजन रखडले असताना यंदा त्यात आणखी भर पडल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

धुळे - जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये यंदाच्या विद्यार्थिसंख्येच्या सर्वेक्षणानंतर चार शिक्षक अतिरिक्‍त झाले आहेत. मागील वर्षाचे २७ अतिरिक्‍त शिक्षकांचे समायोजन रखडले असताना यंदा त्यात आणखी भर पडल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

सप्टेंबर २०१६ अखेर जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपापल्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्येची ‘सरल’वर नोंदणी केली. त्यात जिल्ह्यातील चार शाळांची विद्यार्थिसंख्या कमी असल्याचे लक्षात आले. त्यापैकी धुळ्यातील तीन व शिंदखेडा तालुक्‍यातील एका शिक्षकाचा समावेश आहे. धुळ्यातील नवीन प्राथमिक शाळा, सराव पाठशाळा, चाळीसगाव रोडवरील रा. बा. पाटील प्राथमिक शाळा व शिंदखेडा येथील सरस्वती विद्यालयाचे प्रत्येकी एक असे एकूण चार शिक्षक अतिरिक्‍त झाले आहेत. 

संस्थाचालकांची उदासीनता 
मागील वर्षी जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये एकूण ६४ शिक्षक अतिरिक्‍त ठरले. त्यापैकी ३७ शिक्षकांचे समायोजन झाले असून, २७ शिक्षक समायोजन व्हायचे बाकी आहेत. समायोजित सदतीस शिक्षकांना शाळांवर हजर करण्याचे आदेश असताना मात्र काही संस्थांनी नकार दाखविला. विस्तार अधिकाऱ्यांचे पथक प्रत्यक्ष जाऊनही आले. काही शाळांनी तात्पुरते हजर केले मात्र दुसऱ्या दिवशी सह्याच करू दिल्या नाहीत. एकूण ३७ पैकी अकरा शिक्षकांना ठरविलेल्या शाळेवर हजर करून घेतले, मात्र उर्वरित शिक्षकांचा प्रश्‍न आजही कायम आहे. जिल्ह्यात अतिरिक्‍त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर उर्वरित १५ ते १६ शिक्षकांना शिक्षण उपसंचालकांच्या चौथ्या फेरीत टाकण्यात आले आहे. या फेरीत शिक्षकांना जिल्ह्याबाहेरही जावे लागू शकते.

तीन शिक्षकांचा निर्णय स्थगित
वडजाई खासगी प्राथमिक शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिसंख्या कमी असल्याने वडजाई येथील दोन व डॉ. आंबेडकर विद्यालयातील एक असे तीन शिक्षकही अतिरिक्‍त होऊ शकतात. पण त्यांची विद्यार्थिसंख्या अधिकृतरीत्या शासनाकडे न आल्याने तीन शिक्षकांना अतिरिक्‍त ठरवायचे की नाही हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला आहे. 

संस्थाचालकांनी अतिरिक्‍त शिक्षकांना हजर करून घ्यावे. अतिरिक्‍त शिक्षकांचे पूर्णतः समायोजन झाल्याशिवाय नवीन शिक्षकांची भरती होणार नाही. अतिरिक्त शिक्षकांना हजर न करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे बॅंकेत वेतन अडविण्यात आले आहे. 
- मोहन देसले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. धुळे 

Web Title: 4 teacher extra in private school