उज्ज्वला योजनेचा 21 हजार महिलांना लाभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

या कंपन्यांच्या वितरकांकडे आतापर्यंत एकूण 32 हजार केवायसी फॉर्म्स जमा झाले आहेत. त्यातील 21 हजार 286 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून, अजूनही 25 हजार लाभार्थ्यांना याचा लाभ द्यायचा असल्याचे चव्हाण म्हणाले

धुळे -  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांतच लाभार्थ्यांना 21 हजारांवर गॅस कनेक्‍शन्स देण्यात आले आहेत. अद्यापही 25 हजार कनेक्‍शन्स द्यायचे असून, त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे येथील विक्री अधिकारी राहुल चव्हाण व डिस्ट्रिक्‍ट नोडल ऑफिसर नरेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पारंपरिक इंधनांचा (लाकूड, गोवऱ्या, कोळसा आदी) वापर करत स्वयंपाक केल्यामुळे महिलांना धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशा महिलांचे स्वास्थ्य चांगले राहावे, धूरमुक्त स्वयंपाक घर असावे, या उद्देशाने केंद्र शासन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून एलपीजी गॅस उपलब्ध करून देत आहे. 1 मे 2016 ला सुरू झालेल्या या योजनेला आता एक वर्ष झाले आहे. या एक वर्षात योजनेचा अनेक गरजू महिलांना लाभ मिळाला आहे. देशभरात एकूण दोन कोटी 20 लाख, तर महाराष्ट्रात नऊ लाख 80 हजार महिलांना याचा लाभ मिळाला आहे.

21 हजारांवर महिलांना लाभ
धुळे जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यास 20 नोव्हेंबर 2016 पासून प्रारंभ झाला. आतापर्यंत एकूण 21 हजार 286 महिलांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे.

अद्यापही 25 हजार उद्दिष्ट
एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल या कंपन्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे. या कंपन्यांच्या वितरकांकडे आतापर्यंत एकूण 32 हजार केवायसी फॉर्म्स जमा झाले आहेत. त्यातील 21 हजार 286 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून, अजूनही 25 हजार लाभार्थ्यांना याचा लाभ द्यायचा असल्याचे चव्हाण म्हणाले.

लाभ घेण्याचे आवाहन
योजनेच्या निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांनी गॅस कंपन्यांच्या वितरकांकडे जाऊन अर्ज सादर करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चव्हाण व श्री. सिंग यांनी केले.

योजनेचा लाभ असा...
- लाभार्थी महिलेचे नाव एसईसीसी-2011 (सोशल, इकॉनॉमिक ऍण्ड कास्ट सेन्सस) अर्थात सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणना यादीत समाविष्ट असणे आवश्‍यक.
- एसईसीसी-2011 चा यादी सर्व ऑइल कंपन्यांच्या एलपीजी वितरकांकडे उपलब्ध आहे.
- दारिद्य्ररेषेखालील महिलांना 1600 रुपयांत डिपॉझिट फ्री कनेक्‍शन.
- 990 रुपयांत शेगडी व पहिल्या रिफीलसाठी कर्ज उपलब्ध.
- कर्जाची परतफेड प्रत्येक रिफीलच्या अनुदानातून कपात.
- आधार कार्ड आवश्‍यक