गौतमनगरमध्ये सापडली 49 शाळाबाह्य मुले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

'चाकं शिक्षणाची' उपक्रमांतर्गत 15 दिवस होणार सर्वेक्षण - फेरी, पथनाट्य, गाण्यांद्वारे जनजागृती

'चाकं शिक्षणाची' उपक्रमांतर्गत 15 दिवस होणार सर्वेक्षण - फेरी, पथनाट्य, गाण्यांद्वारे जनजागृती
नाशिक - 'आम्ही शिकतो तुम्ही शिका... या आपण सारे मिळून शिकू या !' हे "चाकं शिक्षणाची' उपक्रमांतर्गत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे अभियान आजपासून सुरू झाले. अंबडमधील गौतमनगरमध्ये पहिल्याच दिवशी 49 मुले शाळाबाह्य आढळली. राजीवनगर, लेखानगर, वडाळा गाव, चेहेडी, फुलेनगर, तपोवन, भंगार बाजार, पाथर्डी फाटा आदी भागांमध्ये हे अभियान 31 मेपर्यंत राबविण्यात येणार आहे.

"चाकं शिक्षणाची' उपक्रमांतर्गत आठ वर्षांपासून फिरत्या शाळेच्या माध्यमातून वंचित मुलांना शिक्षण देण्यात येत आहे. दोन वर्षांपासून शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या पुढाकारातून शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा "एव्हरी चाइल्ड काउंट' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ज्यात हेल्पलाइन 8983335555 च्या माध्यमातून नागरिकांच्या सहाय्याने आणि मोबाईल ऍपद्वारे झोपडपट्टी, बांधकामे आदी ठिकाणी सर्वेक्षण करून अडीच हजारांहून अधिक शाळाबाह्य मुलांना शोधून काढत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यात आले आहे. दोन वर्षांपासून गौतमनगर झोपडपट्टीतील 120 मुले शैक्षणिक दत्तक घेतली असून, या मुलांना शैक्षणिक सुविधांबरोबर शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली आहे. याच मुलांना घेऊन यंदा शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. नववी ते बारावीच्या मुली सर्वेक्षण करणार आहेत. तसेच फेरी, पथनाट्य, गाण्यांद्वारे प्रबोधन सुरू झाले.

महापालिकेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या हस्ते सर्वेक्षणाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर गौतमनगर भागात काढण्यात आलेल्या फेरीत श्री. उपासनी आणि श्री. जोशी सहभागी झाले. शाळेत जाणारे विद्यार्थी त्यांच्या इतर मित्रांचे समुपदेशन करतील, त्याचा परिणाम अधिक होईल, असा विश्‍वास श्री. उपासनी यांनी व्यक्त केला. श्री. जोशी यांनी सर्वेक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Web Title: 49 out of school child receive in gautamnagar