आयुर्वेदाद्वारे पाच हजार शस्त्रक्रिया यशस्‍वी!

आयुर्वेदाद्वारे पाच हजार शस्त्रक्रिया यशस्‍वी!

डॉ. पराग जहागिरदार यांचा उपक्रम; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर
जळगाव - आजकाल वेगवेगळे आजार उद्‌भवत आहेत. या आजारांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील यंत्रसामग्री आली. कॉम्प्युटरराइज्डसह लेझर व दुर्बिणीद्वारे अशा वेगवेगळ्या आणि महागड्या शस्त्रक्रिया आल्या आहेत. याच अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करीत आयुर्वेदाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करून उपचार करणे हे जरा वेगळेच वाटते; परंतु अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे शक्‍य असून, जळगावातीलच डॉ. पराग जहागिरदार हे गेल्या बारा वर्षांपासून शस्त्रक्रिया करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत पाच हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत.

आजकालची बदलती जीवनशैली आणि आहारविहार यांमुळे वेगवेगळे आजार उद्‌भवत आहेत. बऱ्याचदा तीव्र वेदना, दुखणे बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया कराव्या लागतात. शस्त्रक्रिया केल्यानंतर लवकर चांगले वाटण्यासोबतच खर्चही तितकाच असतो. मात्र, आयुर्वेदातून शस्त्रक्रिया करून उपचार करण्याची पद्धत जरा वेगळीच. मूळव्याध, भगंदर या आजारांना आयुर्वेदाद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात. मुख्य म्हणजे मूळव्याधसारखा आजार समूळ नष्ट होण्याचा दावा डॉ. जहागिरदार अनुभवातून सांगतात. डॉ. जहागिरदार यांनी वाराणसी येथील बनारस हिंद युनिव्हर्सिटीत स्कॉलरशिपमधून आयुर्वेद आणि आयुर्वेदाद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे शिक्षण पूर्ण केले.

रडणाऱ्या रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य
आयुर्वेदाद्वारे शस्त्रक्रिया ही संकल्पना जरा वेगळी असली, तरी याद्वारे केले जाणारे उपचार निश्‍चितच फायद्याचे ठरतात. आवश्‍यकतेनुसार आयुर्वेदिक तेलाचा वापर करून जखमा महिनाभरात चांगल्या होतात. यानुसारच २००५ मध्ये खंडवा येथील ‘भगंदर’ झालेला रुग्ण आला. मुंबई येथे केयूएम हॉस्पिटलमध्ये चार वेळा ज्याची शस्त्रक्रिया झाली होती, असा रुग्ण जगावे की मरावे, अशा मनःस्थितीत डॉ. जहागिरदार यांच्याकडे आला. यावेळी डॉ. जहागिरदार यांनी हॉस्पिटलदेखील सुरू केले नव्हते. अशा स्थितीत आणि केयूएम हॉस्पिटलमधून आल्याने रुग्णाची मानसिक स्थिती खालावलेली होती. त्यावेळी सुरवातीला कौन्सिलिंग करीत आजार चांगला होण्याचा विश्‍वास देत जगात उत्कृष्ट मानली जाणारी आयुर्वेदातील ‘क्षारसूत्र’ ही जळगावात पहिली शस्त्रक्रिया डॉ. जहागिरदार यांनी केली. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर जखमेत विरघळून जाणारा ‘क्षारसूत्र’ दोरा दहा- बारा दिवसांनंतर परत टाकावा लागतो. चार महिन्यांत रुग्णाचा ‘भगंदर’ आजार पूर्णपणे बरा झाला आणि एका रडत आलेल्या रुग्णाला हसत पाठविण्यात आले.

मूळव्याधीच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया
मूळव्याध हा आजार विशेषकरून बैठेकाम करणाऱ्या लोकांमध्ये आढळतो. हा गुदद्वाराचा आजार असून, चुकीच्या सवयींमुळे मूळव्याधीची समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. मूळव्याध म्हणजे शौचाच्या जागी आलेला कोंब शस्त्रक्रिया करून काढला जात असतो. डॉ. जहागिरदार यांनी गेल्या दहा-बारा वर्षांत आयुर्वेदाद्वारे पाच हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. यातील सर्वाधिक म्हणजे ८० टक्‍के शस्त्रक्रिया या मूळव्याधीच्या आहेत. मुख्य म्हणजे अन्य प्रकारे मूळव्याधीवर इलाज केल्यानंतर पुनःपुन्हा ही व्याधी उद्‌भवत असते; परंतु आयुर्वेदाद्वारे शस्त्रक्रिया करून केलेला इलाज हा व्याधी समूळ नष्ट होत असल्याचे डॉ. जहागिरदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com