
Dhule News |लेव्हीसह मजुरीचे थकीत 56 लाख मिळण्यासाठी निर्णय; मापाडी कामगारांचे मंगळवारी आत्मदहन
धुळे : शहरालगत मोराणे शिवारातील प्रताप नाना महाले कांदा खरेदी-विक्री केंद्रात नोंदणीकृत कामगारांना काम मिळावे आणि माथाडी मंडळाकडून लेव्हीसह ५६ लाख ६२ हजार १५०
रुपयांची थकीत मजुरी मिळावी यासाठी मापाडी कामगार संघटनेने मंगळवारी (ता. २८) सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. (56 lakh 62 thousand 150 including levy for Mathadi Mandal Mapadi labor union warned of mass self immolation to get arrears dhule news)
सरकारी यंत्रणेकडून हा तिढा कसा सोडविला जातो याकडे सर्वांचे लक्ष असेल.संघटनेचे अध्यक्ष कैलास शिंदे यांनी पत्रकाद्वारे सांगितले, की मागण्यांबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.प्रताप नाना महाले कांदा खरेदी-विक्री केंद्रात कामाची मोलमजुरी मिळून झालेल्या लेव्हीची ५६ लाख ६२ हजारांची रक्कम मिळणे अपेक्षित आहे.
ही रक्कम माथाडी मंडळात जमा होणे आणि तिचे नोंदणीकृत मापाडी कामगारांना वाटप होणे आवश्यक होते; परंतु संबंधित वसुली अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी तथा माथाडी मंडळाच्या सचिवांना वारंवार पत्र दिल्यानंतरही दखल घेतली जात नाही. ते मागणी रक्कम अदा करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
पैसे वसुलीचा प्रश्न
मागणीसाठी मापाडी (तोलणार) कामगारांनी माथाडी मंडळाच्या कार्यालयात १२६ दिवस धरणे आंदोलन केले. यादरम्यान माथाडी मंडळाच्या सचिवांनी मंडळास प्राप्त अधिकारानुसार जमीन महसूल अधिकारांतर्गत वसुली प्रक्रिया सुरू केली.
याबाबत २० ऑक्टोबर २०२२, तसेच १० नोव्हेंबर २०२२ आणि ४ जानेवारी २०२३ ला सुनावणी झाली. यानंतर तरतुदीनुसार वसुलीची पुढील प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविणे गरजेचे होते.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
गेल्या दोन वर्षांपासून मापाडी कामगारांना हक्काचे काम व हक्काची मजुरी मिळावी यासाठी संबंधित आस्थापनेवर वसुलीसंदर्भात पुढील कार्यवाही मंडळाने करणे अपेक्षित होते. परंतु ४ जानेवारीच्या अंतिम सुनावणीस आज ४९ दिवस झाली असूनही जिल्हाधिकाऱ्यांकडे वसुलीची रक्कम कळविण्यास माथाडी मंडळाचे सचिव टाळाटाळ करीत असल्याची तक्रार आहे.
नैराश्य अन् मागण्या
याप्रश्नी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, माथाडी मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांना वेळोवेळी पत्राद्वारे माहिती दिली. त्याची दखल घेतली जात नसल्याने नैराश्यातून मापाडी कामगारांनी मंगळवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे.
महाले कांदा खरेदी-विक्री केंद्र या खासगी बाजार समितीत होणारे वजनमाप अनोंदणीकृत कामगारांकडून करून न घेता माथाडी मंडळातील नोंदणीधारक मापाडी कामगारांकडून करून घ्यावे.
पणन संचालकांनी महाले कांदा खरेदी-विक्री केंद्रात मापाडी कामगारांना काम करण्याची परवानगी दिली असल्यामुळे या आदेशाचे पालन व्हावे. माथाडी मंडळ सचिवांच्या लेखी परवानगीने महाले खासगी बाजार समितीत होणाऱ्या वजनमापाची नोंद ठेवण्यासाठी मापाडी
कामगारांना सुपूर्द केलेल्या अधिकारानुसार थकीत लेव्ही, मजुरीसह ५६ लाख ६२ हजारांची रक्कम तरतुदीनुसार वसूल करावी. तसेच नियमानुसार वसुलीची पुढील प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावी, अशी संघटनेची मागणी असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
मापाडी कामगारांची मागणी रक्कम ही पडताळणी करूनच दिली जात असते. त्यासाठी काम केल्याचा ठोस पुरावा लागतो. हजेरी बुक पूर्ण लागते. अशा बाबींची पूर्तता झाली की मागणी रक्कम देता येऊ शकते. यातील त्रुटींमुळे अंमलबजावणीला विलंब लागत आहे.
प्रताप महाले या खासगी बाजार समितीने नोंदणीकृत मापाडी कामगारांना काम दिले पाहिजे. त्यांना कामावर घेतले पाहिजे. अनेक दिवसांपासून हा तिढा कायम आहे. तो सुटण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. याप्रश्नी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास सकारात्मक प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा आहे. -अ. ज. रुईकर, सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव, माथाडी मंडळ, धुळे��