आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज जळगाव शहरातून सुरू झाली. या यात्रेनिमित्त ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळीची भेट घेतली.

जळगाव - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज जळगाव शहरातून सुरू झाली. या यात्रेनिमित्त ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळीची भेट घेतली. 

सकाळी सुरवातीला जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुल परिसरातील गणपती मंदिरात ठाकरे यांच्याहस्ते महापूजा झाली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तीकर, संजय राऊत, माजी मंत्री सुरेश जैन, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील व जळगाव महानगर शिवसेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

ठाकरे यांच्या या यात्रेत मुंबई येथून २५ प्रवासी चारचाकींचा ताफाही होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अगदी शिस्तीने हा ताफा पुढे शिरसोली (ता. जळगाव) येथे पोचला. तेथे शेतकरी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. ही यात्रा पाचोरा (जि. जळगाव) येथे पोचली. तेथे लहान सभा घेण्यात आली.

भडगाव, एरंडोल व पारोळा येथे यात्रेचे स्वागत झाले. ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. धरणगाव येथे सभा झाली, नंतर हा ताफा धुळ्यात पोचला. शुक्रवारी येथे आदित्य सभा घेणार असल्याची माहिती मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaditya-Thackeray Janaashirvad yatra Politics