मतदार याद्यांच्या घोळाविरोधात  आता सत्ताधाऱ्यांचाही आवाज 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

मतदार याद्यांच्या घोळाविरोधात 
आता सत्ताधाऱ्यांचाही आवाज 

मतदार याद्यांच्या घोळाविरोधात 
आता सत्ताधाऱ्यांचाही आवाज 

जळगाव : महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याबाबत अनेक तक्रारी आहेत. यावर आज सत्ताधारी खानदेश विकास आघाडीच्या सदस्यांनीही आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली. याबाबत आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आलेल्या हरकतींवर "स्पॉट' व्हिजिट करून पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप मतदार यादी महापालिका प्रशासनाने पाच जूनला जाहीर केली. मतदार यादीतील घोळाबाबत आधीच विरोधी पक्षाकडून तक्रारी होत असताना आज सत्ताधारी खानदेश विकास आघाडीच्या सदस्यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेऊन घोळाबाबत तक्रार केली. महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती ज्योती इंगळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, श्‍यामकांत सोनवणे, चेतन शिरसाळे, अनंत जोशी आदींनी भेट घेतली. 

मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात 
सत्ताधारी नेत्यांनी आयुक्तांना याद्यांबाबत प्रत्यक्ष झालेल्या घोळाबाबत माहिती दिली. यादीतील मतदारांची दुसऱ्या प्रभागात नावे असल्याचे, तसेच पुरवणी यादीत देखील अनेक मतदारांचा नावे नाहीत. यादीच्या "टायटल'मुळे घोळ झाल्याचे आयुक्तांना सांगितले. 

रहिवास पुरावा कोण देणार? 
मतदार यादीतील घोळाबाबत आयुक्तांनी महापौर, उपमहापौर यांच्यासोबत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी आलेल्या हरकतींमध्ये रहिवास पुरावा सादर करण्याचे सांगितले. मात्र पदाधिकाऱ्यांनी रहिवास पुरावा आम्ही सादर करणार नाही, प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करताना पुरावा घ्यावा, असे सांगितले. त्यामुळे अर्धातास यावर चर्चा झाली. 

 
प्रत्यक्ष पाहणी करा... 
मतदार यादीत रहिवासाव्यतिरिक्त इतर प्रभागांमध्ये मतदारांची नावे असल्याच्या हरकती येतील. संबंधित व्यक्तीने पुराव्यासह तक्रारी केल्यास प्रत्यक्षस्थळी चौकशी करता येऊ शकते. त्यासाठी महापालिका कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष जाऊन रहिवासी पुराव्याद्वारे पडताळणी करावी, असे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

झालेल्या घोळाने अधिकारी घाबरले 
बहुसदस्यी प्रभागरचनेनुसार प्रारूप मतदार यादी तयार करताना घोळ झाला आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता एकाच ठिकाणी बसून कागदोपत्रानुसार याद्या तयार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी चांगलेच घाबरलेले असून पुन्हा याद्यांचे काम करावे लागणार आहे. 

 
आतापर्यंत 689 हरकती 
महापालिका प्रशासनाने पाच जूनला प्रारूप मतदार यादी जाहीर केली. परंतु मतदार यादीतील घोळामुळे या यादीवर हरकती येऊ लागल्या आहेत. आठ जूनपर्यंत 45 हरकती आल्या होता. तर आज चक्क 19 प्रभागांतून तब्बल 438 हरकती आल्या असून एकूण 689 हरकती आल्या आहेत.

Web Title: aata