शिक्षकांनी सुरू केला शैक्षणिक कीर्तन सप्ताह

Academic kirtan week begins by teachers
Academic kirtan week begins by teachers

देऊर : गावोगावी अखंड हरीनाम किर्तन सप्ताह सोहळा साजरा केला जातो. मात्र कोठारे (ता.धुळे) येथील जिल्हा परिषद शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी तसेच दरवर्षी गावातील विद्यार्थ्यांचे मेंढ्या मागे होणारे स्थलांतर रोखणे, दैनंदिन उपस्थिती टिकविणे, पंच्याऐंशी टक्के शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता, आरोग्य, मुलींचे शिक्षण, शौचालयाचा वापर, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, मुलींचे लवकर लग्न अशा महत्वपूर्ण विषयांवर पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करीत गावातील जिल्हा परिषद शाळेत विठ्ठल नामाचा प्रगत शैक्षणिक गजर सुरू केला आहे. त्यात ग्रामस्थ पालकांना सहभागी करून शिक्षणाच्या पंढरी कडे यशदायी प्रवास सुरू केला आहे. 

डिजिटल तंत्रज्ञानाचे वर्ग सर्वत्र सुरू असतांना पालक व विद्यार्थी यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकावेत. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी पालकांचे विचार लक्षात घेत अनोख्या पद्धतीने शैक्षणिक अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळा सुरू केला आहे. यामुळे पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असलेली जिल्हा परिषद शाळा बोलकी झाली आहे.

गावाची लोकसंख्या सातशेवर आहे. पूर्ण ठेलारी समाजाचे गाव आहे. शेतीसह मेंढ्या चारणे हा व्यवसाय या ग्रामस्थांचा आहे. या मेंढ्या चारणीसाठी पालक आपली मुले, मुली सोबत नेत असल्याने शाळेकडे दुर्लक्ष होत. विद्यार्थी स्थलांतरामुळे शैक्षणिक गुणवत्ता दूरची गोष्ट होती. हे चित्र बदलण्यासाठी येथील उपक्रमशील शिक्षक व सध्या बदली झालेले शिक्षक विजय पाटील, शिवाजी आटले, रमेश पाटील यांनी पालक व विद्यार्थ्यांना काय हवे आहे? काय केले पाहिजे? याचा विचार करीत शिक्षक ह.भ.प. न्हानू माळी यांच्या सहकार्याने धार्मिकतेची जोड देत शैक्षणिक कीर्तन सप्ताह सुरू केला. आजपर्यंत या गावात कुठलाही कीर्तन सप्ताहाचा मागमूस नव्हता. शैक्षणिक वातावरणापासून दोन हात लांब असलेल्या या गावात सप्ताहात सात दिवस पालकांना मुलांचे शिक्षण, आरोग्य, स्थलांतरीत होतांना मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. आदि विषयांवर किर्तनकार महाराजांनी आपल्या अभंगातून प्रबोधन केले. महिला पालकांसाठी खास महिला किर्तनकार आमंत्रित करण्यात आल्या. गावातील काही पालकांनी बाहेरगावी शिक्षणासाठी टाकलेले मुले आता आपल्या गावातील शाळेत टाकले आहेत. 

2016 मध्ये पहिली ते चौथीच्या वर्गाची पटसंख्या 56 होती. कीर्तन सप्ताह सुरू केल्यापासून 2017 पासून पाचवीचा वर्ग वाढला. ही पटसंख्या 57 वरून 117 झाली. यंदा 130 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सरासरी उपस्थिती 121 महिन्याला असते. गेल्या वर्षी नाशिक विभागावर योगासना मध्ये कोठारे जिल्हा परिषद शाळा पोहचली. पूर्वी एकही पालक शाळेकडे फिरकत नव्हता. सप्ताहामुळे  शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 

सध्या या यशाची धुरा बदलीने आलेले मुख्याध्यापक रामचंद्र वाघ, संजय पाटील, अधिकार पाटील, रमेश पाटील, शिवाजी आटले साभांळत आहेत. नवा अध्याय शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरणार आहे. 

शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा विषय होत असतांना, येथील शिक्षकांची मिरवणूक ग्रामस्थांनी चक्क बैलगाडीवर बसवून ढोल ताशात काढली. व घरोघरी औक्षण करण्यात आले. हा सन्मान त्या शिक्षकांनी केलेल्या कामाची पावती होय. बकरी ईद ची शासकीय सुटी असतांना येथील मुख्याध्यापक, शिक्षक येथील कार्यक्रमासाठी शाळेत हजर होते. 

"शैक्षणिक कीर्तन सप्ताहामुळे विद्यार्थ्यांची  उपस्थिती  टिकविण्यासाठी संजीवनी मिळाली आहे. डिजिटल वर्गापेक्षा परिणामकारक व उत्साहपूर्ण हा सप्ताह आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ झाली." 
- विजय पाटील, उपक्रमशील शिक्षक 
जिल्हा परिषद शाळा धुळे 

"माझा मुलगा दुसरी, तिसरीत नियमित शाळेत जात नव्हता.  सप्ताहामुळे आता चौथीच्या वर्गात  दररोज शाळेत जातो. शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे."
- राघो कोळपे, पालक कोठारे (ता.धुळे)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com