esakal | सुसाट वेगावर हवा लगाम; नऊ वर्षांत १६१ जणांचा मृत्‍यू 
sakal

बोलून बातमी शोधा

accident marathi news songire highway accident speed controlled

गतिरोधक बसवायचे होते तर चौपदरीकरण कशाला? हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मुजोर कंपनीने जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

सुसाट वेगावर हवा लगाम; नऊ वर्षांत १६१ जणांचा मृत्‍यू 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर : येथील पोलिस ठाणेअंतर्गत मुंबई-आग्रा महामार्गावर वाढते अपघात चिंता व संतापाची बाब ठरले असून, अपघात रोखणार कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गावरील धमाणे ते सोनगीर या बारा किलोमीटरदरम्‍यान अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चौपदरीकरण झाल्यापासून गेल्या नऊ वर्षांत ३६२ अपघात झाले असून, त्यात १६१ जणांना प्राण गमवावे लागले. तर तब्बल ३५९ जण जबर जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले. 

आवश्य वाचा- धुळे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची शंभर जणांवर रंगीत तालीम 

अपघात कमी करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड व उड्डाणपूल न देता चौपदरीकरण करणाऱ्या सदभाव कंपनीने धुळे ते पळासनेरपर्यंत प्रत्येक गावात दोन्ही ट्रॅकवर गतिरोधक बसवल्यामुळे ट्रकचालकाला अधिक भुर्दंड बसू लागला आहे. गतिरोधक बसवायचे होते तर चौपदरीकरण कशाला? हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मुजोर कंपनीने जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, गतिरोधक टाकूनही अपघात थांबले नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार गत वर्षी गतिरोधक काढून टाकताच देवभाने फाट्यावर पिता-पुत्रांचा अपघातात मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी आंदोलने करताच पुन्हा देवभाने, नगाव येथे गतिरोधक टाकले. पण उड्डाणपूल दिलाच नाही. आता तर मागाल तेथे गतिरोधक, असे कंपनीचे धोरण आहे. 


अपघाताचा धोका कायम 
पोलिस ठाणेअंतर्गत सोनगीर ते धमाणे फाटा, हा अवघा बारा किलोमीटर रस्ता येतो. कमी अंतर असूनही अपघातांची संख्या जास्त आहे. याला बेदरकारपणे वाहन चालविणारे प्रवासी जबाबदार की महामार्गाचे अयोग्य चौपदरीकरण, याचा विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. २०१२ मध्ये धुळे- पळासनेर चौपदरीकरण झाले. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत. पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या अपघातांचीच ही संख्या असून, किरकोळ दुखापती व तडजोडीमुळे नोंद न झालेल्या अपघातांची संख्या मोजल्यास आठवड्यात सरासरी दोन अपघात हे प्रमाण दिसते. 

वर्ष अपघात संख्या ठार संख्या जखमी 
२०१२ ५१ २७ ४० 
२०१३ ३९ १७ ३५ 
२०१४ ४५ १९ ४१ 
२०१५ ३७ २० ७५ 
२०१६ ३४ ११ ३८ 
२०१७ ३९ १५ ४५ 
२०१८ ४० १५ २५ 
२०१९ ४२ २० ४२ 
२०२० ३५ १७ १८ 

अपघात न होण्यासाठी नॅशनल हायवे ॲथोरिटी यांनी जिथे जिथे अपघात स्‍थळ प्रवण क्षेत्र आहे त्‍या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी. एक जणाचा मृत्यू झाला, तर त्‍याचा संसार उद्ध्वस्त होता. ते होता कामा नये. आवश्‍यक त्‍या ठिकाणी उड्डाणपूल व इतर उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
-कुणाल पाटील, आमदार 


 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image