सतराशे थकबाकीदारांना महावितरणचा "शॉक'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

औरंगाबाद शहर मंडळअंतर्गत वीज बिल न भरणाऱ्या 730 ग्राहकांचा 68 लाख 75 हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. 13 ग्राहकांची वीज जोडणी कायमस्वरूपी कट केली. 779 ग्राहकांकडून 36 लाख 42 हजार रुपये वसूल केले

औरंगाबाद - महावितरणने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील 1 हजार 765 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या ग्राहकांनी एक कोटी 37 लाख 19 हजार रुपये थकविले आहेत. तसेच 1 हजार 199 वीज ग्राहकांकडून 52 लाख 73 हजार रुपये वसुली करण्यात आली. या कारवाईचा बडगा थकबाकीदार असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेवरही उगरण्यात आला. यामध्ये सात वीज जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यांनी 19 लाख 94 हजार रुपये थकविले होते.

औरंगाबाद शहर मंडळअंतर्गत वीज बिल न भरणाऱ्या 730 ग्राहकांचा 68 लाख 75 हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. 13 ग्राहकांची वीज जोडणी कायमस्वरूपी कट केली. 779 ग्राहकांकडून 36 लाख 42 हजार रुपये वसूल केले. औरंगाबाद ग्रामीण मंडळअंतर्गत 289 ग्राहकांचा 14 लाख 70 हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला. 10 ग्राहकांची वीज जोडणी कायमस्वरूपी तोडण्यात आली; तर 209 ग्राहकांकडून 11 लाख 29 हजार रुपये वसूल केले. जालना जिल्ह्यात 746 ग्राहकांकडे एकूण 53 लाख 74 हजार रुपये थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा कट करण्यात आला. दरम्यान, 211 ग्राहकांकडून 5 लाख 2 हजार रुपये वसूल केले.

वीजचोरी करू नका
वीज ग्राहकांनी अनधिकृत आकडे टाकून, मीटरमध्ये छेडछाड करून विजेचा वापर करू नये. मीटर तपासणी मोहिमेत महावितरण पथकास असे वीजचोरीचे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर विद्युत कायदा 2003 नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पाणीपुरवठा योजनांवरही कारवाई
औरंगाबाद ग्रामीणमधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या सात वीज जोडण्यांचे 19 लाख 94 हजार रुपये देयक थकीत आहे. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला; तर 8 वीज जोडण्यांकडून 1 लाख 35 हजार रुपये वसूल करण्यात आले.

Web Title: action against defaulters