ऍड. विजय पाटलांच्या 90 मतांचे 'संशोधन' सुरू

ऍड. विजय पाटलांच्या 90 मतांचे 'संशोधन' सुरू

जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक नेहमी "अर्थपूर्ण' व्यवहाराने संपूर्ण राज्यात गाजते. यावेळीही ती गाजली असती. मात्र, समोर वजनदार उमेदवार नव्हता. तरीही अपक्षाच्या रूपाने रिंगणात असलेल्या ऍड. विजय भास्करराव पाटील यांनी मिळविलेल्या 90 मतांबद्दल कमालीची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे त्यांना मिळालेल्या या मतांमध्ये भुसावळ केंद्रावरील 38 व जळगाव केंद्रातील 30 मतांचा समावेश असल्याने ही मते नेमकी कुणाची, यावर "संशोधन' सुरू झाले आहे.

विधान परिषदेची जळगावातील निवडणूक वरवर एकतर्फी निकालाचा परिणाम देणारी दिसत असली, तरी या निवडणुकीत 90 मते मिळविणाऱ्या ऍड. विजय पाटील यांच्या कामगिरीबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कोट्यवधींच्या अर्थव्यवहारावर होणाऱ्या या निवडणुकीत ऍड. पाटील यांनी रुपयाही खर्च न करता 90 मते मिळविली. निवडणुकीसाठी जिल्हाभरात सात मतदान केंद्रांवर मतदान झाले. या सातही केंद्रांच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता ऍड. पाटील यांना भुसावळ केंद्रातून 38, तर जळगावमधून 30 मते मिळाली.

मते कुणाची?
भुसावळ केंद्रावर भुसावळसह वरणगाव, बोदवड, मुक्ताईनगरचे मतदान होते, तर जळगाव केंद्रावर जळगावसह जामनेर तालुक्‍याचे मतदान होते. त्यामुळे स्वाभाविकच या भागातील मतदारांना ऍड. विजय पाटील यांची भूमिका कशी काय मान्य झाली? या मतदारांपर्यंत भाजपचे उमेदवार पोहोचले नव्हते काय? उमेदवार पोहोचूनही या मतदारांना अपेक्षित "आश्‍वासन' मिळाले नाही का? की सर्व व्यवस्थित झाल्यावरही या मतदारांनी ऍड. विजय पाटलांच्या पारड्यात मते टाकली? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जळगाव शहरात तर महापालिकेतील भाजप, सत्ताधारी "खाविआ'सह राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना सदस्य भाजप उमेदवारासोबत होते. जामनेर तालुका तर जलसंपदामंत्र्यांचा. त्यामुळे जळगाव केंद्रावरील 30 मते नेमकी कुणाची? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

मतांवर संशोधन सुरू
विशेष म्हणजे ज्यांना ही मते मिळाली त्या ऍड. विजय पाटील यांना त्याबद्दल अजिबात आश्‍चर्य वाटत नाही. मात्र, भाजपमधील काही धुरिणांना या 90 मतांबद्दल उत्सुकता लागली आहे. त्यातही महाजन समर्थकांनी ही मते नेमकी कुणाची, कोणत्या कारणासाठी ती ऍड. पाटलांच्या पारड्यात गेली, या साऱ्याचा शोध सुरू केला आहे. वेगवेगळ्या केंद्रांवरील एकेक मताचा हिशेब, ऍड. पाटील यांना मिळालेल्या मतांचे "संशोधन'ही यानिमित्ताने अशाप्रकारे सुरू झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com