दिवाळीनंतर पर्यटकांची पसंती नाशिकलाच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

भारतीय जनमनावर कित्येक दशके अधिराज्य गाजविलेल्या मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे चरित्र म्हणजे एक आदर्श राजा, पूत्र, पती असे राहिले आहे. श्रीरामाच्या पंचवटीतील चौदा वर्षांच्या वनवासातील वास्तव्यामुळे हा परिसर धार्मिक पर्यटकांना नेहमीच खुणावतो. त्यामुळे यापरिसरात देशभरातील भाविकांची बारमाही वर्दळ असते. सद्या दिवाळी सुट्यांच्या काळ सुरू असल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

नाशिक : दिवाळीनंतर शहराच्या धार्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. राज्यासह परराज्यातील यात्रेकरू मोठ्या संख्येने दाखल झाल्याने कालपासून गंगाघाटावर गाड्या उभ्या करायलाही जागा शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. यात्रेकरूंच्या वाढत्या संख्येने पंचवटीतील हॉटेल्ससह धर्मशाळाही फुल्ल झाल्याने नाशिकच्या अर्थकारणासही काही प्रमाणात "बुस्ट' मिळाल्याचे चित्र आहे. 

 रामकुंड, काळाराम मंदिरासह सीतागुंफा आदी ठिकाणी गर्दी

भारतीय जनमनावर कित्येक दशके अधिराज्य गाजविलेल्या मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे चरित्र म्हणजे एक आदर्श राजा, पूत्र, पती असे राहिले आहे. श्रीरामाच्या पंचवटीतील चौदा वर्षांच्या वनवासातील वास्तव्यामुळे हा परिसर धार्मिक पर्यटकांना नेहमीच खुणावतो. त्यामुळे यापरिसरात देशभरातील भाविकांची बारमाही वर्दळ असते. सद्या दिवाळी सुट्यांच्या काळ सुरू असल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने येथील काही धर्मशाळा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मात्र यातील अनेक पर्यटकांना रात्री राहण्यासाठी मुक्कामाचे दर आटोक्‍याबाहेर असल्याने बऱ्याच जणांनी आपल्या वाहनांजवळ गोदातीरीच मुक्काम करणे पसंत केले. वाढत्या पर्यटक संख्येमुळे रामकुंड, काळाराम मंदिरासह सीतागुंफा, कपालेश्‍वर, तपोवन आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे.

परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल

भाविकांच्या वाढत्या संख्येने यावर्षी महापूरामुळे मोठे नुकसान अनुभवलेल्या गोदातीरावरील व्यवसायालाही काही प्रमाणात "बुस्ट' मिळाल्याचे दिसून येते. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यावर जुलैपासून सुरू असलेल्या पावसाच्या धुवांधार बॅटींगमुळे गोदाकाठचे वातावरण विस्कळीत झाले होते. आता पाऊस सुरू असलातरी नदीकाठची स्थिती पूर्वपदावर आल्याने तसेच दिवाळीच्या सलग सुट्यांचे औचित्य साधत विविध राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने व्यावसायातही तेजी आली आहे. 

 

पर्यटकांची पहिली पसंती केरळला 

दिवाळीच्या सुट्यांचे औचित्य साधत ज्याप्रकारे राज्यासह परराज्यातील यात्रेकरू शहरात दाखल झाले आहेत. याचवेळी शहरातील व्यावसायिकांसह नोकरदारांनीही सहलीचे आयोजन केले आहे, यासाठी पहिली पसंती केरळला त्यानंतर राजस्थान, गुजरातला राहिली आहे. कोकणसह गोव्याच्या किनाऱ्यावर नुकत्याच धडकलेल्या चक्रीवादळामुळे पर्यटक कोकणासह गोव्याला जाणे टाळत असल्याचे चित्र आहे. याशिवाय काही पर्यटकांची पसंती अष्टविनायक यात्रेलाही असल्याने तिलाही चांगली प्रतिसाद मिळत आहे.विदेशी सहलीमध्ये पर्यटकांनी पहिली पसंती दुबईला त्यानंतर थायलंड, बॅंकॉक, पटायाला राहिल्याचे दिसून येते. 

प्रतिक्रिया

यावर्षी दिवाळीनंतर पर्यटकांची पहिली पसंती केरळला तर त्यानंतर राजस्थान, गुजरातला राहिली आहे. परदेशी पर्यटनात दुबईसह थायलंड, बॅंकॉकला मागणी आहे. - ब्रीजमोहन चौधरी, ब्रीजमोहन टुरिझम. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Diwali, tourists prefer Nashik