तीन दिवसांच्या सुटीनंतर बॅंकांमध्ये पुन्हा गर्दी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

रांगा पाहून अनेक जण परतले माघारी; बहुतांश ‘एटीएम’ही बंदच
जळगाव - केंद्र सरकारच्या पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर आठवड्यापूर्वी स्थिती काहीशी पूर्वपदावर येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर काही अपवाद वगळता बहुंताश ‘एटीएम’ बंद असणे, सुरू असलेल्या ‘एटीएम’वर केवळ दोन हजार रुपयांची नोट मिळणे, काही बॅंका वगळता इतर बॅंकांमध्ये पुरेशी कॅश नसल्याने ग्राहकांना हवे तेवढे पैसे न मिळणे, विड्रॉल स्लीपऐवजी चेकद्वारेच पैसे मिळणे आदी प्रकार सुरूच असल्याने सर्वांनाच आर्थिक चणचण भासत आहे.

रांगा पाहून अनेक जण परतले माघारी; बहुतांश ‘एटीएम’ही बंदच
जळगाव - केंद्र सरकारच्या पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर आठवड्यापूर्वी स्थिती काहीशी पूर्वपदावर येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर काही अपवाद वगळता बहुंताश ‘एटीएम’ बंद असणे, सुरू असलेल्या ‘एटीएम’वर केवळ दोन हजार रुपयांची नोट मिळणे, काही बॅंका वगळता इतर बॅंकांमध्ये पुरेशी कॅश नसल्याने ग्राहकांना हवे तेवढे पैसे न मिळणे, विड्रॉल स्लीपऐवजी चेकद्वारेच पैसे मिळणे आदी प्रकार सुरूच असल्याने सर्वांनाच आर्थिक चणचण भासत आहे.

त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. १० ते १२ डिसेंबरदरम्यान सलग सुट्या आल्याने तीन दिवस बॅंकांसह ‘एटीएम’ही बंद होते. त्यामुळे आज सकाळी बॅंकांसह ‘एटीएम’ची स्थिती सुरळीत होऊन सर्वांना कॅश मिळेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, बॅंकांमध्ये पुरेशी कॅश नाही अन्‌ ‘एटीएम’ही बंद असल्याने अनेकांचे आर्थिक नियोजन पुन्हा कोलमडलेले दिसून आले. सकाळी नऊपासूनच बॅंकांसमोर लांबच लांब रांगा लागल्या, त्या बॅंक बंद होण्यापर्यंत कायम होत्या. त्यामुळे अनेकांनी रांगा पाहून घरी परतणे पसंत केले, तर काहींनी पैशांसाठी दीड ते दोन तास रांगेत घालविल्याचे चित्र विविध बॅंकांमध्ये पाहावयास मिळाले.
 

रांगेतच दोन-अडीच तास
बॅंकांचे व्यवहार सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे बंद होते. या सुट्यांनंतर आज बॅंकांचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. अनेकांनी तीन दिवसांपासून अडलेले काम पूर्ण करण्याच्या अपेक्षेने सकाळपासूनच बॅंकेच्या प्रवेशद्वाराजवळ रांगा लावल्या होत्या. या रांगा वाढतच गेल्याने नागरिकांना किमान दोन-अडीच तास रांगेत उभे राहिल्यानंतरच खात्यातून पैसे काढता येत होते. ही परिस्थिती शहरातील सर्वच बॅंकांच्या आवारात दुपारपर्यंत पाहावयास मिळाली. त्यानंतर मात्र तुलनेत गर्दी काहीशी कमी झाली. 

बहुतांश ‘एटीएम’ बंदच
‘तांत्रिक कारणास्तव ‘एटीएम’ बंद’ हा फलक प्रामुख्याने एचडीएफसी, आयडीबीआय, आयसीआयसीआय, स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा (शिवकॉलनी) येथे कायमच होते. त्यामुळे अनेक नागरिक स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखा व ॲक्‍सिस बॅंकेच्या ‘एटीएम’समोर रांगेत उभे राहून पैसे काढताना दिसून आले.

सुट्या पैशांची समस्या
चलनात दोन हजार रुपयांच्या नोटेचा समावेश होण्यास साधारण महिना झाला. त्यानंतर पाचशेची नवीन नोट गेल्या आठवड्यात जळगावातील स्टेट बॅंकेत दाखल झाली. परंतु, काही बॅंकांमध्ये ही नोट अजूनही पोहोचलेली नसून, सुट्या पैशांची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. एक हजार रुपये काढणाऱ्यांना कोणतीही बॅंक पैसे देत नसल्याची सद्यःस्थिती आहे. तसेच बॅंक खात्यात केवळ अकराशे रुपये शिल्लक असताना एक हजार रुपये काढायचे असूनही दोन हजार रुपये काढण्याची सक्‍ती बॅंक कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याची तक्रार एका ज्येष्ठ नागरिकाने ‘सकाळ’शी बोलताना केली.

नागरिकांचे बोल...

चार ‘एटीएम’ला भेट देऊनही उपयोग नाही
अशोक महाले ः गेल्या तीन दिवसांपासून बॅंकांसह ‘एटीएम’ही बंद होते. आज चार ‘एटीएम’ केंद्रांसह बॅंकेत पैसे काढायला आलो, तरीही पैसे मिळाले नाहीत. एक हजार रुपये काढायचे असून, बॅंकेत सुट्या नोटाच नसल्याने दोन हजार रुपये काढण्यास कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. मुळात खात्यात तितकी रक्‍कमच नसताना असा आग्रह झाला. त्यामुळे मी पैसे न काढताच परत जात आहे.

रांग पाहून परत जातोय
स्वप्नील तायडे - नोटा बंदीच्या निर्णयानंतर पैशांची समस्या खूपच सतावत आहे. सर्वच व्यवहार करणे कठीण बनले आहे. गेले तीन दिवस सलग सुट्या आल्यानंतर आज बॅंकेत चेक जमा करण्यासह पैसे काढण्याकरिता आलो. यात ‘एटीएम’ बंदच असल्याने खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. बॅंकेतील मोठी रांग पाहून घरी परतत आहे. बॅंकेने ‘एटीएम’मध्ये पुरेशी कॅश भरून ते सुरू ठेवायला हवे. जेणेकरून ग्राहकांची गैरसोय दूर होईल.

काम सोडून उभे राहणे शक्‍य नाही
दामोदर धारकर - बॅंका शनिवारपासून तीन दिवस बंद होत्या. यात आजही ‘एटीएम’ बंद असल्याने पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे छोटे व्यवहार करताच येणार नाहीत. चेकने पैसे काढायचे म्हटले, तर भली मोठी रांग लागली आहे. या रांगेत काम सोडून उभे राहणे शक्‍यच नाही. एकूणच नोटा बंदीचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी किती दिवस हा त्रास होईल कुणास ठाऊक?

पैसे नसल्याने अडचण
भारती बाविस्कर - बॅंकेत पैसे काढण्यासाठी सकाळपासून आली होती. दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर पैसे काढता आले. गेले तीन दिवस बॅंक आणि ‘एटीएम’ बंदच असल्याने आज घरातील सर्व कामे सोडून इतका वेळ रांगेत उभे राहावे लागले. पैसेच नसल्याने मोठी अडचण सहन करावी लागत आहे.

आहे त्यात भागवतोय
वीरेंद्र चव्हाण - ‘कॅशलेस’ व्यवहार करणे सोपे आहे. परंतु, रोजच्या लागणाऱ्या किरकोळ खर्चासाठी पैसा लागतोच. बॅंका, ‘एटीएम’ बंद असल्याने पैसेच काढता आले नाहीत. त्यामुळे जवळ असलेल्या पैशातच तीन दिवस कसेतरी काढले. आता आवश्‍यकता असल्याने पैसे काढण्यासाठी बॅंकेत आलो आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर पैसे मिळाले. त्यात पाचशेच्या नव्या नोटा मिळाल्याचा आनंद आहे.

दोन तास रांगेत
दीपाली पाटील - मी मूळची मध्य प्रदेशातील असून, शिक्षणासाठी जळगावात आली आहे. नोटा बंदीमुळे पैशांची खूपच अडचण येत असून, लागणारा खर्च भागविण्यासाठी पैसा लागतोच. तीन दिवसांपासून पैसा काढण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने आज बॅंकेत दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर पैसे मिळाले.

Web Title: After three days of holidays banks in the crowd