अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सतर्कता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

अयोध्या निकालाच्या अनुषंगाने शहर-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यात दोन अपर पोलिस अधीक्षक, आठ पोलिस उपअधीक्षक, ३० पोलिस निरीक्षक, ८० सहाय्यक पोलिस निरीक्षक, दोन हजार ५०० पोलिस कर्मचारी व ६०० होमगार्ड कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरून फिक्‍स पॉइंट, पायी गस्त, वाहनावरील पेट्रोलिंग अशा पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शहरात चार पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक आयुक्त, १५ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सुमारे दोन हजार पोलिस कर्मचारी व ४०० होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.

नाशिक : अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील व जिल्ह्यात पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी बैठका घेत सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. 

शहर आयुक्तालयात आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे, आडगाव पोलिस मुख्यालयात डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली होती. या वेळी अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालय देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था असून, न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांना बंधनकारक असेल. हा निकाल कोणाचाही विजय अथवा पराजय नसून तो न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे निकाल काहीही असो त्याचा सर्वांनी सन्मान राखलाच पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. तसेच पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांकडून पोलिस ठाणे हद्दीत शांतता कमिटीच्या बैठकांचा आढावा घेण्यात आला.

दोन हजार पोलिस कर्मचारी व ४०० होमगार्ड तैनात

या निकालाच्या अनुषंगाने शहर-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यात दोन अपर पोलिस अधीक्षक, आठ पोलिस उपअधीक्षक, ३० पोलिस निरीक्षक, ८० सहाय्यक पोलिस निरीक्षक, दोन हजार ५०० पोलिस कर्मचारी व ६०० होमगार्ड कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरून फिक्‍स पॉइंट, पायी गस्त, वाहनावरील पेट्रोलिंग अशा पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शहरात चार पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक आयुक्त, १५ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सुमारे दोन हजार पोलिस कर्मचारी व ४०० होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. तसेच शीघ्र कृती दल, दंगानियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दल यांसह विविध पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. 

सोशल मीडियावर करडी नजर 
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व्हॉट्‌सऍप, फेसबुक अथवा सोशल मीडियावर सामाजिक भावना दुखावल्या जातील अशा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. समाजकंटकांनी अफवा पसरवून सार्वजनिक शांततेला बाधा पोचवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केल्यास त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alert in Nashik district due to Ayodhya results