देशप्रेमामुळे आंबेडकरांची "पुणे करारा'वर स्वाक्षरी - तुषार गांधी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नाशिक - महात्मा गांधी यांनी दलित बांधवांवर अन्यायच केला. बापूजींना वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली, अशा चुकीच्या गोष्टी  समाजात पसरवण्यात आल्या आहेत. पण, डॉ. आंबेडकर यांनी देशप्रेमापोटी करारावर स्वाक्षरी केली आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे केले. तसेच, बापूजी आणि बाबासाहेब यांच्यात वैचारिक मतभेद होते; पण दोघांमध्ये शत्रुत्व नव्हते, असेही त्यांनी अधोरेखित केले. 

ब्रिटिश राजकीयदृष्ट्या विभक्तीकरण करू इच्छित होते आणि त्यातून स्वातंत्र्य मिळणार नाही, हे बाबासाहेबांना समजले होते, असे स्पष्ट करून श्री. गांधी म्हणाले, की बापूजी आणि डॉ. आंबेडकर यांचे भक्त आमनसामने आले आहेत. त्यामुळे आपल्यात फूट पाडण्याचा यशस्वी प्रयत्न चाललाय. आता "ऑल इज वेल' नसल्याच्या युगात मार्क्‍स, गांधी, डॉ. आंबेडकर आपल्यात नाहीत. म्हणूनच दलित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या प्रश्‍नांवर वैचारिकतेच्या आधारावर लढा द्यावा लागेल. प्रत्येकाला देशासाठी वेळेचा त्याग करावा लागेल. ब्रिटिशांप्रमाणे फूट पाडण्याचा प्रयत्न होत असताना तर्काच्या आधारे प्रश्‍न विचारावे लागतील. मग भले प्रश्‍न विचारणारे देशद्रोही आहेत असे म्हटले, तरी हरकत नाही. प्रश्‍न विचारणारे हे देशप्रेमी आणि उत्तर न देणारे देशद्रोही-गद्दार आहेत. त्यामुळे अशांना निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून "जुमले' बांधावे लागतात. 

विचार जागर मंच आणि कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या तिसऱ्या मार्क्‍स, गांधी, आंबेडकर विचारमंथनाचे उद्‌घाटन श्री. गांधी यांच्या हस्ते झाले. विविध रंग एकमेकांमध्ये भेदभाव निर्माण करताहेत. अशा परिस्थितीत रंगांच्या भिंती तोडून माणुसकीची गाठ बांधायला हवी, हा संदेश उद्‌घाटनातून देण्यासाठी विविध रंगांच्या कापडांना श्री. गांधी यांनी गाठ बांधली. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. गोपाळ गुरू, वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष रामचंद्र जाधव, अन्वर राजन, डॉ. शशिकला राय, डॉ. भालचंद्र कानगो आदी या वेळी उपस्थित होते. 

Web Title: Ambedkar's signature on Pune Corruption due to patriotism