नागरी वस्तीत बिअरबार सुरू करण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

जळगाव - महाबळ परिसरातील नागरी वस्तीतील संकुलात बिअरबारला परवानगी देण्याचा घाट घातला आहे. त्याला स्थानिक रहिवासी व परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या भागात शंभर टक्के नागरी वस्ती, शाळा व मंदिर असून बिअरबारमुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य खराब होणार असल्याने त्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी या परिसरातील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

जळगाव - महाबळ परिसरातील नागरी वस्तीतील संकुलात बिअरबारला परवानगी देण्याचा घाट घातला आहे. त्याला स्थानिक रहिवासी व परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या भागात शंभर टक्के नागरी वस्ती, शाळा व मंदिर असून बिअरबारमुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य खराब होणार असल्याने त्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी या परिसरातील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

या बिअरबारला विरोध करत त्यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन आज (ता.२७) राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्री. आढाव यांची भेट घेतली व त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. महाबळ परिसरातील मुख्य रस्त्यावरील मानस प्लाझा या संकुलात खाली व्यापारी गाळे आहेत, तर वरील तीन मजल्यांवर रहिवासी फ्लॅट्‌स आहेत. या संकुलातील व्यापारी गाळ्यांमध्ये सलून, किराणा व स्टेशनरी दुकान, हार्डवेअर, दवाखाना, इलेक्‍ट्रिकल्स, म्युझिक सेंटर आदी दुकाने आहे. या दुकानांवर लहान मुलांसह, तरुण व सर्व गटातील नागरिक येत असतात. तसेच सभोवतालचा भाग पूर्णत: नागरी वस्तीचा परिसर असून बाजूलाच बाहेती विद्यालय, हेमंत क्‍लासेससारख्या शैक्षणिक संस्थाही आहेत. जवळच रिक्षा व बसथांबा असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ याठिकाणी असते.

असे असताना या संकुलात बिअरबारला परवानगी दिल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे परिसरातील मुलांवर वाईट परिणाम होतील, तसेच महिला व मुलींच्या छेडखानीचे प्रकारही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य खराब होणार असून कोणत्याही स्थितीत या संकुलात अथवा परिसरात कुठेही बिअरबारला परवानगी देऊ नये, असे नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर परिसरातील शेकडो नागरिकांसह महिलांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.

आहे तो बारही बंद करावा
काही दिवसांपूर्वी रामानंदनगर परिसरातील बारमुळे त्याठिकाणी मोठा वाद उद्‌भवून हाणामारी झाली होती. मानस प्लाझामध्ये आधीपासून तुषार बिअरबार नावाने हॉटेल असून त्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. अशा स्थितीत आणखी एक बार सुरू झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आहे तो बारही बंद करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. याआधीही येथील नागरिकांनी याठिकाणी सुरु होणाऱ्या बारबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, त्यावेळी बारला परवानगी नाकारण्यात आली होती.

Web Title: Among civil conflict to begin beerbar