लष्कराची हद्द शिथिल करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

नाशिक - संरक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार शंभर मीटरलगत कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करण्याच्या निर्णयामुळे अनेक नागरिकांना समस्या निर्माण झाल्याने लष्कराची हद्द शिथिल करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव सादर करण्याची मागणी नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी आज महासभेत केली.

नाशिक - संरक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार शंभर मीटरलगत कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करण्याच्या निर्णयामुळे अनेक नागरिकांना समस्या निर्माण झाल्याने लष्कराची हद्द शिथिल करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव सादर करण्याची मागणी नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी आज महासभेत केली.

नाशिक रोडला लागून असलेला बराचसा भाग लष्करासह हवाई दलाच्या क्षेत्रात येतो. या ठिकाणी आर्टिलरी सेंटरही आहे. या ठिकाणी युद्धसरावाची प्रात्यक्षिके केली जातात. त्यामुळे या परिसरात बांधकाम करण्यासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार शंभर मीटर लागून कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करण्याच्या निर्णयामुळे या परिसरात असलेल्या अनेकांच्या भूखंडावर बांधकाम करण्यास अडचणी येत असल्याचे मेहरोलिया यांनी सांगितले. 

पुणे, नगर, मुंबई शहरांमध्येही लष्कराच्या हद्दीत अशा प्रकारची बांधकामे करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, हद्दीसंदर्भात काही शिथिलता आणून ती शंभर मीटरवरून दहा मीटर करण्यात आली. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही असा निर्णय घेण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव सादर करण्याची मागणी त्यांनी केली. 

यासंदर्भात नगरसेवक शिवाजी सहाणे यांनीही खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे हा प्रश्‍न मांडल्याचे सांगितले. 

पाऊण तासात सर्व विषयांना मंजुरी
महासभेत मंजुरीसाठी आलेल्या जादा विषयांना सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमुखाने मंजुरी दर्शविल्याने अवघ्या ४५ मिनिटांत सभा संपली. सुमारे ६६ लाखांच्या विकासकामांच्या प्रशासकीय मंजुरीसह ५० लाखांच्या वाहन खरेदीला मंजुरी देण्यात आली. नववर्षात ६ जानेवारीला अखेरची महासभा होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. मागील महासभेत झालेल्या सर्व इतिवृत्त कायम करण्यास मंजुरी देत वर्षातील अखेरच्या महासभेत सुरवात झाली. महासभेवर ठेवलेल्या खुल्या जागेस वॉल कंपाउंड, डीपी रस्त्याच्या साइडपट्टीस पेव्हर ब्लॉक बसविणे, गटार लाइनचे काम, प्रभाग ३९ मधील एनडीसीसी बॅंक द्वारका ते गुमशाहबाबा दर्ग्यापर्यंतच्या रस्त्याच्या नामकरणाचा विषय, व्यायामशाळेत प्रशिक्षण नेमणूक, मॅरेथॉन स्पर्धेस अनुदान, धम्मचक्र अनुप्रवर्तक दिन व बुद्धविहाराच्या वर्धापनदिनाच्या खर्चास मंजुरी अशा विविध विषयांसह ऐनवेळी आलेल्या जादा विषयांना तत्काळ मंजुरी दिली. महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदी, सरळ सेवेद्वारे भरती या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
 

‘पाच वर्षांत खूप काही शिकले’
महासभेत नगरसेविका ललिता भालेराव यांनी मनोगत व्यक्त करताना पाच वर्षांत वरिष्ठांकडून खूप काही शिकल्याचे सांगत आरक्षणामुळे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार नसल्याची खंत व्यक्त केली. येणाऱ्या महिला प्रतिनिधींना कामकाज शिकविण्यासाठी कार्यशाळा घेण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे महिला लोकप्रतिनिधींची कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आवाहनही केले. शिवाजी सहाणे यांनीही पक्षाच्या भिंती तोडून पक्ष व पदाधिकाऱ्यांनी मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. निवडून आल्यानंतर पहिल्या महासभेत दिलेला स्वतंत्र भूसंपादन समितीचा प्रस्ताव पाच वर्षांच्या काळात प्रशासनाकडून मान्य न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

Web Title: Army area limit