कलेसाठी आयुष्य वाहून घेतलं, मात्र राहायला स्वतःचं घर नाही

नंदा पुणेकर
नंदा पुणेकर

नाशिक - वयाच्या अकराव्या वर्षापासून कलेची आवड निर्माण झाली. आई आणि दोन मोठ्या बहिणींही तमाशात काम करायच्या. त्यामुळे मीही आपोआप तिकडे ओढले गेले. त्यातूनच लावणी शिकले. अनेक वर्षे तमाशात काम केल्यानंतर स्वतः लावणीचे कार्यक्रम सादर करू लागले. कलेसाठी आयुष्य वाहून घेतलं. मात्र आजही राहायला स्वतःचं घरदेखील नसल्याची खंत लावणी कलावंत नंदा पुणेकर यांनी व्यक्त केली.

माझा जन्म पुण्यात झाला. आई तमाशात काम करायची, तर वडिलांचा घोड्याच्या नालेचा व्यवसाय होता. शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंत झाले. घरातच कलेचे वातावरण असल्याने लहान वयातच मलाही आवड निर्माण झाली. वयाच्या अकराव्या वर्षीच सरस्वती कोल्हापूरकर व अमन तांबे यांच्या फडात मी पहिल्यांदा काम केले. त्यानंतर पुढे काळू-बाळू, चंद्रकांत ढवळपुरीकर, मंगला बनसोडे, आनंद महाजन यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसोबत काम केले. तमाशात लावणीसह भूमिका, वगनाट्य, संवाद अशी सगळीच कामे मी करायची. तमाशाची कामे पुढे कमी होत गेली. नंतर रोजीरोटीसाठी लावणीचे कार्यक्रम सुरू केले. सुरेखा पुणेकरांसोबत काही दिवस काम केल्यानंतर माझा स्वतःचा ग्रुप तयार केला. ‘नंदा पुणेकर’ नावाने लावणीचे कार्यक्रम महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली येथेही केले. दिल्ली येथील कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी उपस्थित राहून लावणी कार्यक्रमाला दाद दिली होती. मराठवाड्यात तर खास महिलांसाठी लावणीचे कार्यक्रम केले, तेव्हा महिलांनी मला अक्षरशः डोक्‍यावर उचलून घेतले होते.

संपूर्ण आयुष्य कलेसाठीच समर्पित केले. लावणी हेच माझं जीवन असं समीकरण बनलं. परंतु आता लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. पारंपरिक लावण्या सादर होत नाहीत. कमी कपड्यात, शिवलेल्या नऊवारी साडीत होणारे बीभत्स सादरीकरण होत असल्याचे पाहून वाईट वाटते. ज्यांना साधा पाय मारता येत नाही, त्यांची वाहवा सध्या सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने बंदिस्त ठिकाणी जी लावणी सादर होते, तिला नावे ठेवली जातात. पण टीव्हीवर जे ओंगळवाणे लावणीचे प्रदर्शन होते, तिला मात्र दाद दिली जाते, असे चित्र सध्या दिसत आहे. लावणी ही पूर्ण झाकलेली असते. त्यातली खरी कला पाहून तिला दाद दिली पाहिजे.

आमच्यासारख्यांच्या कष्टांवर अनेकजण मोठे झाले. मात्र आमच्यासारखे कलावंत आहे तिथेच आहेत. आजही भाड्याच्या खोलीत राहूनच जीवन जगावे लागत आहे. शासनाकडूनही दखल घेतली गेली नाही, अशी खंत नंदा पुणेकर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com