महाराष्ट्रात एटीएममध्ये खडखडाट आणि कर्नाटकात काय? अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

खासदार चव्हाण म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने अस्थिर परिस्थिती केली असून कामगारापासून ते व्यापारी, बेरोजगार, शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण अडचणीत आले आहेत.

नांदेड - महाराष्ट्रात सर्वच एटीएममध्ये सध्या खडखडाट असून नोटाच शिल्लक राहिल्या नाहीत. नोटाबंदीतून भाजपने काय साध्य केले? त्याचबरोबर सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू असून तिथे मात्र दोन हजाराच्या नोटांचाही सुकाळ झाला आहे. त्यामुळे भाजपवर शंका व्यक्त होत असून आता जनतेने त्यातून बोध घ्यावा, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरूवारी (ता. १९) व्यक्त केले. 

काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठवाडा स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिबिर तसेच जाहीर सभा नांदेडला आयोजित केली आहे. त्यानिमित्त दुपारच्या सत्रात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे प्रभारी मोहनप्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार कुमार केतकर, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी प्रास्ताविक केले तर माजी मंत्री आमदार डी. पी. सावंत, आमदार अमिता चव्हाण, महापौर शीला भवरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर आदींनी स्वागत केले. 

खासदार चव्हाण म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने अस्थिर परिस्थिती केली असून कामगारापासून ते व्यापारी, बेरोजगार, शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण अडचणीत आले आहेत. खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. अल्पसंख्याक आणि दलितांवर हल्ले व अत्याचार होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिले नाही. मुख्यमंत्री व पंतप्रधान त्यावर काहीच भाष्य करत नाहीत तर भाजपचे पदाधिकारी समर्थन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार कुमार केतकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांनीही शिबिरात मार्गदर्शन केले. आमच्या सरकारमधील योजना बंद करण्याचा तसेच आमच्या चांगल्या योजनांची नावे बदलून त्याच योजना सुरु करण्याचा घाट भाजप सरकारने घातला असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. खासदार केतकर म्हणाले की, जगाच्या पातळीवर भारत - पाकिस्तान असा वाद करून तर देशात हिंदू - मुस्लिम असा वाद करून भाजप सर्वांचीच फसवणुक करत आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्याला एक वर्षभर सावध रहावे लागणार आहे. दहशतवाद निर्माण करून मोदी आणि भाजप सरकार परत सत्ता मिळवू पाहत आहे. त्यामुळे आत्तापासूनच त्यांचा डाव ओळखून काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Ashok Chavhan Criticised Maharashtra Government For No Cash In ATM