बालिकेवरील अत्याचाराचे हिंसक पडसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

पोलिस गाड्यांची जाळपोळ, रास्ता रोको, पोलिसांकडून हवेत गोळीबार

पोलिस गाड्यांची जाळपोळ, रास्ता रोको, पोलिसांकडून हवेत गोळीबार

नाशिक - त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील तळेगाव-अंजनेरी येथे शनिवारी घडलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाला आज सकाळी हिंसक वळण लागले. जिल्ह्यात जागोजागी रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला. संतप्त जमावाने विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या गाडीसह अन्य गाड्यांची तोडफोड व जाळपोळ केली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांनाही आगी लावण्यात आल्या. पोलिसांची अतिरिक्त कुमक आल्यावर जमाव पांगविण्यासाठी हवेत गोळीबार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.  

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, तसेच पोलिसांनी सोशल मीडियावरील 

अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आज दुपारी पालकमंत्र्यांनी या प्रकरणी पंधरा दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली जाईल, अशी घोषणा केली.   

तळेगावातील १६ वर्षांच्या मुलाने चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समजल्यानंतर काल (ता. ८) त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्याला संतप्त जमावाने घेराव घातला होता. नाशिक शहर व परिसरात रात्रभर रस्ते रोखण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी लवकर पीडित मुलगी व तिच्या पालकांची भेट घेऊन आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही दिली. रविवारी सकाळी नऊपासून त्र्यंबकेश्‍वर-नाशिक रस्त्यावरील तळेगाव फाटा येथे ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुरू केला. सरकारविरोधी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्याच वेळी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. माध्यमांच्या प्रतिनिधींना छायाचित्रे घेण्यास मज्जाव केला. बाचाबाची होऊन कॅमेरामनला मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता, जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. पोलिसांनी बॅरिकेडिंगच्या आधारे दगडाच्या माऱ्यापासून बचावाचा प्रयत्न केला, तेव्हा जमावाने पोलिसांच्या सुमो गाडीला लक्ष्य केले. ती जाळण्यात आली. नंतर काही आंदोलकांनी त्याठिकाणी आणखी दोन गाड्या जाळल्या. परिस्थिती चिघळल्याने मोजक्‍या पोलिस कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. 

अश्रुधूर व हवेत गोळीबार
अचानक सुरू झालेल्या दगडफेकीमुळे रस्त्यालगतच्या वस्तीवरील नागरिकांनी घरात शिरून स्वत:चा बचाव केला. बंदोबस्ताचे पोलिस, वाहतूक पोलिसांनी झाडांच्या आड लपून दगडांचा मारा चुकवला. बचावासाठी पोलिसांकडे कोणतेही साधन नव्हते. हवेतील गोळीबार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यावर जमाव पांगला. काही आंदोलक डोंगराच्या दिशेने पळाले, तर काही दुतर्फा रस्त्याने मागे हटले. त्यामुळे रस्त्यावर एकच धावपळ उडाली.

‘अत्याचाराला प्रयत्न कसे म्हणता?’
अत्याचारासंबंधी पालकमंत्री महाजन यांचे दूरचित्रवाहिन्यांवरून ‘अत्याचाराचा प्रयत्न झाला’, असे वक्तव्य प्रसारित होण्यास सुरवात झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अत्याचाराला ‘प्रयत्न कसे म्हणता?’ असा प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यांमध्ये पालकमंत्री प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत नाहीत ना? अशा भावनेतून रास्ता रोकोसह आंदोलनाची तीव्रता वाढली. पालकमंत्री थांबलेल्या सरकारी विश्रामगृहात संतप्त कार्यकर्त्यांचा जमाव धडकला व त्यांनी पालकमंत्र्यांना जाब विचारण्यास सुरवात केली. ‘संशयित अल्पवयीन असल्याने त्याविषयी सहानुभूती दर्शविली जात आहे का?’, ‘भाजपमध्ये प्रवेश दिलेल्या कार्यकर्त्याकडून आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियामधून व्हायरल कसे होतात?’ असे प्रश्‍न उपस्थित केले.

अत्याचारग्रस्त मुलीच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांच्या विधानाबद्दल टीका करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत प्रकरणाबद्दल मी गंभीर असून, रात्रीपासून तीन वेळा मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्याशी बोलणे झाले आहे. पंधरा दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल होईल, असे स्पष्ट केले.
 

आरोपपत्र १५ दिवसांत
ठिकठिकाणी उद्रेक सुरू असतानाच आज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ‘अत्याचाराचा प्रयत्न झाल्या’चा उल्लेख केल्याने नागरिकांचा संताप वाढला. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे त्र्यंबकेश्‍वरला जात होते. मार्गावर त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि मोबाईलवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवला. मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या मोबाईलवरूनच उपस्थितांना सरकार संवेदनशील असून, येत्या १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे व विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे आश्‍वासन दिले. अपर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांना त्यासंबंधीच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

Web Title: assault violent by child persecution