दोन-अडीच हजारांच्या रकमेने "एटीएम'समोरील रांगा संपेना!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

जळगाव - "कॅशलेस' व्यवहाराकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने नोटा बंदी झाली. काही ठिकाणी "कॅशलेस' व्यवहारांना सुरवातही झाली. परंतु अडीअडचणीवेळी लागणाऱ्या रोकडची मागणी अजूनही कायम आहे. "एटीएम'मधून मिळणाऱ्या दोन ते अडीच हजारांची रक्‍कम पूर्ण होत असल्याने केंद्राबाहेरील रांगा संपत नसल्याचे चित्र रोजच पाहावयास मिळत आहे.

जळगाव - "कॅशलेस' व्यवहाराकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने नोटा बंदी झाली. काही ठिकाणी "कॅशलेस' व्यवहारांना सुरवातही झाली. परंतु अडीअडचणीवेळी लागणाऱ्या रोकडची मागणी अजूनही कायम आहे. "एटीएम'मधून मिळणाऱ्या दोन ते अडीच हजारांची रक्‍कम पूर्ण होत असल्याने केंद्राबाहेरील रांगा संपत नसल्याचे चित्र रोजच पाहावयास मिळत आहे.

केंद्र सरकारने गेल्या महिन्यात चलनातून पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बाद नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी पन्नास दिवसांची मुदत दिली. म्हणजे आता ही मुदत संपण्यास अवघे पंधरा दिवस बाकी आहेत. नोटा बंदीनंतर प्रामुख्याने "कॅशलेस' व्यवहार वाढविण्यास सरकारने भर देत जनतेला आवाहनही केले. त्यानुसार अनेकांनी "कॅशलेस' व्यवहार करण्यास सुरवात केली आहे. तरीही बॅंक खात्यातून रोख रकमा काढणाऱ्यांची संख्या कमी झालेली नसून, बॅंकांबाहेर रांगा कायम आहेत. ही परिस्थिती आणखी एक महिना तरी राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एक महिन्यापेक्षा जादा कालावधी उलटला, तरी होणाऱ्या त्रासाने नागरिक कंटाळले आहेत. मात्र, सरकारच्या निर्णयाबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्‍त करत आहेत.

"एटीएम'मधून अडीच हजार
सरकारने दिलेल्या आदेशानुसार "एटीएम'मधून पैसे काढणाऱ्यांसाठी दिवसाला अडीच हजार रुपयांची मर्यादा आखून दिली आहे. "कॅशलेस' व्यवहार होत असले, तरी "कॅश'शिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती आहे. शिवाय मशिनमधून अडीच हजार रुपये काढता येत आहेत. काही मशिनमधून तर केवळ दोनच हजार रुपये निघत असल्याने आजही "एटीएम' मशिनबाहेरील रांगा कायम असल्याचे दिसून आले. दिवसभरात कधीही पाहिले, तरी रांगा कायमच असतात. हीच स्थिती बॅंकांबाहेरही आहे.

"कॅश' उपलब्ध होऊनही ठणठणाट
जिल्ह्यात नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल इतकी "कॅश' असल्याचे स्टेट बॅंकेतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी बऱ्याच बॅंकांमध्ये "कॅश'चा तुटवडा जाणवत आहे. इतकेच नव्हे, तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यातून रक्‍कम काढणाऱ्यांना पाच हजार रुपये दिले जात असल्याचे मुख्य शाखेतील काही नागरिकांनी सांगितले. तसेच अन्य बॅंकांना पुरेशी "कॅश' मिळत नसल्याने "एटीएम' बंद करून ठेवले आहेत.

जिल्ह्यात कोठेही समस्या निर्माण होणार नाही इतकी "कॅश' प्राप्त झालेली आहे. तसेच सरकारने ठरवून दिलेल्या धोरणांप्रमाणे ग्राहकांना बॅंकेतून चोवीस हजारांपर्यंतची रक्‍कम आणि "एटीएम'मधून अडीच हजार रुपये दिले जात आहेत.
- उदय पानसे, सहा. महाप्रबंधक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, जळगाव

Web Title: atm queue jalgaon