satana
satana

बागलाण तालुक्यात सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. सुभाष भामरे

सटाणा - ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून बेघर तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्यांणना पक्की घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेतून बागलाण तालुक्यात सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी काल सोमवार (ता.१) रोजी येथे केले. 

येथील तहसील कार्यालय समोरील पोलीस कवायत मैदानावर 'प्रधानमंत्री ग्रामीण आवास' योजनेअंतर्गत आयोजित तालुक्यातील लाभार्थ्यांच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री डॉ. भामरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, डॉ.शेषराव पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पाटील, पंचायत समिती सभापती विमल सोनवणे, उपसभापती शीतल कोर आदी उपस्थित होते.
 
मंत्री डॉ. भामरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनातर्फे समाजातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ऑनलाइन प्रणाली स्वीकारण्यात आली असून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होत आहे. त्यामुळे साहजिकच गरजू लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबली असून दलालांपासून सुटका झाली आहे. बागलाण तालुक्यासाठी घरकुल उद्दिष्ट वाढवून मिळावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. आपण त्या समितीचे अध्यक्ष असल्याने येत्या काळात तालुक्यासाठी अधिकाधिक घरकुले मंजूर करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राहील, असेही डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. भामरे यांच्या हस्ते तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

जिल्हाध्यक्ष दादा जाधव, डॉ. बच्छाव, यतीन पाटील आदींची भाषणे झाली. गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केली. कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे, कण्हू गायकवाड, साधना गवळी, लता बच्छाव, नगरसेविका निर्मला भदाणे, पुष्पा सूर्यवंशी, प्रवीण सोनवणे, बाजार समिती सभापती मंगला सोनवणे, संचालक संजय देवरे, ज्ञानेश्वर देवरे, कृष्णा भामरे, भाऊसाहेब भामरे, डॉ. गोकुळ अहिरे, सटाणा व नामपूर बाजार समितीचे संचालक व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. मेळाव्यासाठी तालुक्यातील शेकडो घरकुल योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

त्यानंतर, त्रिगुणेश्वर महादेव मंदिर आवारात आज आयोजित अप्पर पुनंद योजनेच्या भव्य पाणी परिषदेत बोलताना मंत्री डॉ. भामरे  म्हणाले, मी टिपिकल राजकारणी नसल्याने झेपत असेल तरच हो म्हणतो आणि हो म्हटलो तर काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सोडत नाही. सर्जन असल्याने आपण कोणतच ऑपरेशन तयारीशिवाय करीत नाही. अगदी त्याचप्रमाणे अप्पर पुनंद योजनेसाठी मी पूर्ण तयारीनिशी उतरलो असून येत्या दीड ते दोन महिन्यात 'मेरी' च्या कार्यालयात या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करणार आहे.

यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, ज्येष्ठ नेते रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, साहेबराव सोनवणे, प्रवीण सोनवणे, डॉ. विलास बच्छाव, सुरेश मोरे, बाळासाहेब बिरारी, अशोक गुंजाळ, संजय देवरे आदी उपस्थित होते. 

डॉ. भामरे म्हणाले, बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याकरिता अप्पर पुनंद प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. अप्पर पुनंद योजनेसाठी उंबरगावजवळ धरण बांधण्याची आवश्यकता असून त्यासाठी ९३ दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित करावे लागणार आहे. मात्र मांजरपाडा - २ किंवा कोसवन / डोंगरी / जयदर या योजनांमधून आपल्याला आधी पाणी आरक्षित करणे गरजेचे आहे. पाणी आरक्षित झाल्याशिवाय कोणताही प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासारखे असून जर अप्पर पुनंद योजना आपल्याला मंजूर करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करायची असेल तर पाणी आरक्षित करण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com