दरोड्याच्या प्रयत्नात ऑडिटरची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चौघांनी घुसून दरोड्याचा प्रयत्न केला. मुंबईतून आलेल्या मॅरियाईकरा सॅज्यू सॅम्युअल (वय 29) या हिशेबनीसाने (ऑडिटर) प्रसंगावधान राखत अलार्म वाजविल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्याने ते जागीच ठार झाले.

नाशिक - मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चौघांनी घुसून दरोड्याचा प्रयत्न केला. मुंबईतून आलेल्या मॅरियाईकरा सॅज्यू सॅम्युअल (वय 29) या हिशेबनीसाने (ऑडिटर) प्रसंगावधान राखत अलार्म वाजविल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्याने ते जागीच ठार झाले. कंपनीचे व्यवस्थापक चंद्रशेखर भास्कर देशपांडे (64) व कर्मचाऱ्यारी कैलास जैन (28) हे संशयितांच्या मारहाणीत जखमी झाले. 

शहरातील मधुरा टॉवर्समध्ये मुथूट फायनान्सचे कार्यालय आहे. आज सकाळी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही नागरिकही उपस्थित होते. त्या वेळी कार्यालयात चार जण घुसले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून व्यवस्थापक देशपांडे यांच्याकडे कार्यालयात जमा असलेल्या रकमेची मागणी केली. मुथूटच्या मुंबईच्या कार्यालयातील ऑडिटर सॅम्युअल त्या वेळी तेथे होते. त्यांनी संशयितांचे लक्ष विचलित करून अलार्म वाजविला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयितांनी सॅम्युअलला मारहाण केली. एका संशयिताने त्याच्याकडील पिस्तुलातून त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्याने ते जागीच कोसळले. त्यानंतर संशयिताने जैन व देशपांडे यांनाही जखमी केले. 

दरम्यान, दरोड्याचा प्रयत्न फसल्याने संशयितांनी पोबारा केला. सॅम्युअल यांना तत्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अंबड पोलिसांत खून, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरोड्यासाठी आलेल्या संशयितांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. यात एका तरुणाचा गोळी लागून दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. कार्यालयातील तिजोऱ्या सीलबंद आहेत. संशयितांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. शहराच्या सीमांवरही पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे. 
-विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auditor murder in nashik

टॅग्स