अन्नपदार्थ भेसळीच्या सेवनाने आजारांची वाढ चिंताजनक

श्रीकृष्ण कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

नाशिक - चैनीच्या साधनांचा अतिरिक्त वापर, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि भेसळीचे अन्नपदार्थ सेवन यामुळे कधी नव्हे एवढे आजार प्रत्येकांच्या मागे लागले आहे. आजारांची वाढती संख्या चिंताजनक असून अन्नसुरक्षा व भेसळीच्या कायद्याची कठोर अमंलबजावणी व्हायला हवी,अशी अपेक्षा टाटा केमिकल्स लिमिटेडच्या शास्त्रज्ञ(फलोत्पादन) सुनिला कुमारी यांनीे व्यक्त केली.

नाशिक - चैनीच्या साधनांचा अतिरिक्त वापर, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि भेसळीचे अन्नपदार्थ सेवन यामुळे कधी नव्हे एवढे आजार प्रत्येकांच्या मागे लागले आहे. आजारांची वाढती संख्या चिंताजनक असून अन्नसुरक्षा व भेसळीच्या कायद्याची कठोर अमंलबजावणी व्हायला हवी,अशी अपेक्षा टाटा केमिकल्स लिमिटेडच्या शास्त्रज्ञ(फलोत्पादन) सुनिला कुमारी यांनीे व्यक्त केली.

"सकाळ फलोत्पादन महापरिषदे'साठी त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. त्या म्हणाल्या, अन्न सुरक्षा हा एक चिंतनाचा विषय झाला आहे. 1996 पासून आपण जर अन्नसुरक्षेविषयक अग्रलेख पाहिले तर त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या आणि योग्य अमंलबजावणीचा अभाव दिसून येते. फळ, भाजीपाला ही एक प्रक्रीया असून ती योग्यपद्धतीनेच व्हायला हवी. चांगल्या प्रक्रियेतून उत्तम दर्जाचे भाजीपाला, फळांचे पिक घेता येते, हे शेतकरी बांधव विसरत चालले आहे. दुर्गंधीयुक्त पाणी, निकृष्ठ दर्जाच्या खतांचा वापर आणि कच्चा फळ,भाजीपाला तातडीने पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर करण्याची शक्कल यामुळे कधी नव्हे एवढा भेसळ होऊ लागली आहे. शेतकरी असे का करत आहे. याचा विचार प्रत्येकाने आज करायला हवा. वातावरण आणि तापमानात सातत्याने बदल होत आहे. हे मान्य आहे, पण शेतकऱ्यांनी त्याच जुन्या पध्दतीत पिकनिर्मिती व उत्पादनास प्राधान्य का द्यायला पाहिजे, असा सर्वांनाच प्रश्‍न पडतो. शेतकऱ्यांनी वातावरणाशी जुळवून घेऊन आपल्या पिकपध्दतीत बदल करायला हवा. अन्नसुरक्षेचा कायदा 2006 मध्ये आला. या कायद्याच्या अमंलबजावणीसाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहे. पण ते पुरेसे नाही. त्यासाठी जागृती व्हायला हवी, भाजीपाला,फळांचे पिक घेतांना आज दुर्गंधीयुक्त पाण्याचा मोठा प्रमाणावर वापर होऊ लागला असून ते अत्यंत धोकादायक आहे. मूळातच चैनीच्या साधनांचा मोठा वापर, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अन्नपदार्थात होणारी भेसळ यामुळे हदयविकार,उच्चरक्तदाब,मधुमेह सारखे आजार प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे लागले आहे. अगदी अल्पवयापासून तर जेष्ठांपर्यत सर्वांचाच या आजारांमध्ये समावेश होऊ लागला आहे. टाटा केमिकल्सने काही वर्षापूर्वी सर्व्हेक्षण केले होते. त्यात कमी वयामध्ये या व्याधी जडत असल्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसले.

स्वस्तच्या मागे लागणे गैर
त्या म्हणाल्या, बि बियाणे, खते,अवजारे केवळ स्वस्त आहे, अनुदानित आहे म्हणून खरेदी करणे चूकीचे आहे.त्यातून आपल्याला कधीही चांगल्याप्रकारचे उत्पादन मिळणार नाही. शेतकऱ्यांनी गुणवत्तेला नेहमी प्राधान्य द्यायला हवी, अन्नसुरक्षा हे गुणवत्तेच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यासाठी जैवविविधता, एकमेकांतील संवादाची दरी, मनुष्यांचा विचार,योग्य पाण्याचा वापर,प्राण्यांच्या दैनंदिन शैलीतून येणारे आजार व त्याची दिनचर्या, शेतीत राबणारे कामगारांची दिनचर्या यासारख्या बाबींचा प्राधान्याने विचार व्हायला हवा, केवळ काही वस्तू स्वस्त मिळतात म्हणून त्याचा वापर करणे हे कधीही शेतकर्यांप्रमाणेच प्रत्येक मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. जमीनीच्या खाली येणारे कांदा,मुळ्यासारख्या भाजीपाल्याचा वापर करतांना ते योग्यपध्दतीने धुवून घेऊनच वापरले पाहिजे, त्यातील रासायनिक क्षमताही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. असे त्या म्हणाल्या

अन्नसुरक्षेचा जागतिक विचार
परदेशातील लोकांची आहारविहार पध्दती ही तेथील वातावरणाला अनुरूप,साजेशी असते, त्यांच्या आहारविहाराची आपण तुलना करू शकत नाही, असे सांगुन त्या म्हणाल्या,अन्नसुरक्षेच्याबाबतीत आता सर्वच देश जागरूक झाले आहे. कडक कायदे करून त्यांच्या योग्य अमंलबजावणीसाठी सरकारबरोबरच नागरीकांचाही पुढाकार वाढत आहे. भारतानेही अन्नसुरक्षेच्या बाबतीत जागतिक विचार लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी भाजीपाला, फळांचे उत्पादन घेणारा शेतकरी,उत्पादक,वितरक,निर्यातदार आणि अखेरीस नागरीक यांनी स्वतःच जागृक रहायला हवे, लुज वेट गेन हेल्थ, कमी वजन ठेवून चांगले आरोग्य राखण्यापेक्षा खाण्याचे, अन्नसुरक्षेचे योग्य नियोजन करा. आपले आरोग्य आपोआपच उत्तम, निरोगी, सदृढ होईल यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांबरोबरच नागरीकांनी अधिक जागृक रहायला पाहिजे,असा आग्रह त्यांनी धरला.

Web Title: Awarneed of Food Security is needed