नाशिकला ‘बबिता’च्या डोहाळे जेवणाची धूम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळावी याकडे या सोहळ्यातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
- संजय जरीवाले, नाशिक

नाशिक - बबिता स्वभावाने शांत, कुणाबरोबरही पटकन मैत्री करणारी. तिच्या डोहाळे जेवणासाठी मांड्याचा बेत होता. फुगड्यांचा खेळही रंगला. बबिता म्हटले, की ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आठवेल. पण ही बबिता मालिकेमधील नसून नाशिकची बबिता आहे. 

जरीवाले दुकानाचे संचालक संजय जरीवाले यांनी गंगापूर येथील बालाजी मंदिराच्या गो-शाळेतून देशी गाईचे वासरू दत्तक घेतले, तिचे नामकरण केले ‘बबिता’. गाईंचे पालन-पोषण करावे हा संदेश देण्यासाठी त्यांनी बबिताच्या डोहाळे जेवण साजरे केले. 

दीडशे जणांची पंगत
‘बबिता’ला पट्टा, बाजूबंद, मुकुट आणि हार घालून सजवले. परिसरातील महिला आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी तिची पूजा-आरती केली. गाणीदेखील म्हटली. आपल्या सखीला त्यांनी घास भरवला. जेवणात पुरणाचे मांडे, आमरस, आमटी, भजी असा बेत होता. परिसरातील शेतकरी, शेतमजुरांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. दीडशे जणांच्या पंगती उठल्या. भोजनाला आलेल्यांचा सन्मानही करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babita Cow Dinner

टॅग्स