बागलाण: मुसळधार पावसाने हजारो टन कांद्याचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

सटाणा - मृग नक्षत्रातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बागलाण वासीयांना काल (ता.१९) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा दिलासा दिला आहे. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. सटाणा बाजार समितीत दुपारनंतरच्या लिलावासाठी आलेला हजारो टन उन्हाळी कांदा ओला झाला. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे दूरवर उडाली. 

सटाणा - मृग नक्षत्रातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बागलाण वासीयांना काल (ता.१९) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा दिलासा दिला आहे. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. सटाणा बाजार समितीत दुपारनंतरच्या लिलावासाठी आलेला हजारो टन उन्हाळी कांदा ओला झाला. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे दूरवर उडाली. 

विंचूर - प्रकाश राज्य महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या वादळी पावसात पिंपलेश्वर रोड वरील आराई पांधी मधील सुभाष नथु पाटील यांच्या शेतातील सालदार रामू पगार यांच्या घराचे पत्रे दूरवर उडून घराची भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने घरात कुणीही नसल्याने अनुचित प्रकार घडला नाही , मात्र त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. 

सटाणा - मालेगाव रस्त्यावरील स्वामी विवेकानंद नगरमध्ये मोठे झाड वीज तारांवर कोसळल्याने शहरातील वीजपुरवठा सायंकाळी पाच पासून खंडित झाला. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाऱ्यामुळे शेत शिवारातील विजेचे खांब कोसळल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा अनिश्चित कालावधी साठी खंडित झाला होता. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. आज सकाळपासूनच उकाड्याने असह्य केले होते. दुपारनंतर आकाशात हळूहळू ढग जमू लागले व सायंकाळी चारच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. सटाणा शहर, मोरेनगर येथील महाविद्यालय परिसर, सावकी फाटा, ठेंगोडा लोहोणेर पर्यंत पावसाच्या सरींनी उग्र रूप धारण केले होते. पावसाच्या वेगवान माऱ्यामुळे पाच ते दहा फूट अंतरापर्यंतही दिसत नसल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ऐन सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी पावसाचे आगमन झाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांची त्रेधातिरपीट उडाली. काही विद्यार्थ्यांनी पावसात भिजून आनंद लुटला. सटाणा शहरातील दैनंदिन भाजीपाला बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची या पावसाने धांदल उडाली. तर बस स्थानकात पावसापासून बचाव करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या पावसामुळे मे महिन्यात लागवड झालेल्या टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर व इतर भाजीपाला पिकांना जोरदार फटका बसल्याचे चित्र आहे. काही शेतकऱ्यांचे या पावसामुळे लाखोंचे नुकसान संभवते. तर खरीप पेरण्यांयोग्य पहिलाच पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. 

Web Title: Baglan: Thousands of tons of onion damage due to rains