डॉ. तांबे निवडून यावेत ही सर्वपक्षीयांची इच्छा - बाळासाहेब थोरात

- संपत देवगिरे
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नाशिक - पदवीधरांचे प्रश्‍न आणि मतदारसंघ हा राजकीय किंवा पक्षीय दृष्टिकोनातून त्याकडे डॉ. सुधीर तांबे यांनी कधीच पाहिले नाही. गेल्या पंधरा दिवसांत जो प्रचार केला त्यात स्वपक्षापेक्षाही अन्य पक्षीय, घटकांतील लोकांनी दिलेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत इतिहास घडेल. कारण डॉ. तांबे निवडून यावेत, ही तर सर्वपक्षातील लोकांची इच्छा आहे, असे माजी महसूलमंत्री डॉ. बाळासाहेब थोरात यांनी "सकाळ'ला सांगितले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील प्रचाराची आज सांगता झाली. या संदर्भात श्री. थोरात म्हणाले, की आम्ही या निवडणुकीत कधीही कोणीही उमेदवार, राजकीय पक्ष अथवा घटकांवर टीका न करता आमच्या उमेदवाराने काय केले एवढेच सांगितले. मात्र, त्यात विभागातील पाचही जिल्ह्यांतील परस्परांचे विरोधकदेखील या निवडणुकीत प्रचारासाठी डॉ. तांबेंबरोबर मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. शिक्षक लोकशाही आघाडीचे शिक्षक पुढे होते. तसेच त्यांचे संस्थाचालकही त्यांच्याबरोबर प्रचारात आले. असे चित्र पाहून अनेकदा मलाही आश्‍चर्य वाटत होते. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्व पक्षांचा स्नेह आणि सहकार्य पाहाता यंदाच्या निवडणुकीत डॉ. तांबे तिसऱ्यांदा ही जागा काबीज करून इतिहास घडवतील, यात मला तरी काहीही शंका राहिलेली नाही.

विधान परिषदेचे पदवीधरसह विविध मतदारसंघ खरे तर पक्षविरहित असून, राजकीय अभिनिवेश न बाळगता त्यात काम व्हावे, असे संकेत आहेत. त्याचे तंतोतंत पालन डॉ. सुधीर तांबे यांनी केले. केवळ पदवीधर नव्हे, तर विविध क्षेत्रांत त्यांचा जनसंपर्क आहे. गेल्या सव्वासात वर्षांत त्यांनी पाचही जिल्ह्यांत प्रत्येक गाव, संस्था अन्‌ शाळेला भेट दिली आहे. अगदी लहानसहान माणसांशी त्यांनी संवाद साधल्याने ते सामान्यांचे आमदार झाले आहेत. अनेक प्रश्‍न मार्गी लावले, काहींसाठी परिश्रम घेतले.

त्यात सगळ्यांना बरोबर घेतले, तसेच कॉंग्रेस असो वा भाजप दोन्ही सरकारांत त्यांनी शिक्षण, समाजाच्या प्रश्‍नांसाठी समन्वय निर्माण केला. हे खूप धैर्य असेल तरच जमते. त्यामुळे विरोधी उमेदवारालाच काय त्यांच्या पक्षालाही त्यांच्यावर टीका करता आलेली नाही, की स्वतःची प्रतिमा निर्माण करता आली नाही. अनेक पक्षांत त्यांचे हितचिंतक निर्माण झाले आहेत. त्या पक्षांची व नेत्यांची नावे सांगणे योग्य नाही.

मात्र, डॉ. तांबे आपण निवडून आलेला आहात, असे त्यांना अनेकांनी सांगितले. ते निवडून यावेत, ही सर्व पक्षांची इच्छा असल्याचे मी आर्वजून सांगेन, असे श्री थोरात यांनी सांगितले.

Web Title: balasaheb thorta talking about dr. sudhir tambe