अंबासन येथे प्लास्टिक पिशव्यांची होळी

दीपक खैरनार
शुक्रवार, 22 जून 2018

सर्व प्रमुख चौकात प्लास्टिक पिशव्यांचा खच पडलेला दिसून येतो. दुसरीकडे पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीला अंबासन येथील ग्रामस्थांनी गावातील प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करून होळी केली व शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.   

अंबासन (जि. नाशिक) - शासनाच्यावतीने गाजावाजा करून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. मात्र जनजागृती अभावी अनेक ठिकाणी आजही राजरोसपणे प्लास्टिकच्या पिशव्याची विक्री होतांना दिसत आहे. कारवाई अभावी ही बंदी कागदोपत्री असल्याचा प्रत्यय बहुतांशी ठिकाणांची स्थिती पाहिल्यावर येते.

सर्व प्रमुख चौकात प्लास्टिक पिशव्यांचा खच पडलेला दिसून येतो. दुसरीकडे पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीला अंबासन येथील ग्रामस्थांनी गावातील प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करून होळी केली व शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.   

भाजीपाला, कापड दुकान, मिठाई, औषधी, हार्डवेअर, किराणा, फेरीवाले आणि खास करून मटन मार्केट यांच्याकडून ग्राहकांना सर्रासपणे प्लास्टीक पिशव्या दिल्या जातात. याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या प्लास्टीक पिशव्यांचा कचराही निदर्शनास पडतो. पर्यावरण प्रदूषित करण्यास ही बाब कारणीभूत ठरत आहे. पूर्वी ही समस्या शहरी भागापर्यंत मर्यादित होती. मात्र आता हे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. यावर कठोर निर्बंध लावण्याची गरज व्यक्त होत आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला, नालीत प्लास्टिक पिशव्याच आढळतात. यामुळे प्लास्टिक पिशव्यावरील बंदी नियमांची पायमल्ली होत आहे. या प्लास्टिक पिशव्या अविघटनशील असल्याने याापासून निर्माण झालेल्या कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे. जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. वनस्पतीच्या मुळांना बाधा पोहचते. अशा अनेक अडचणीमुळे प्लास्टिक पिशव्या या पर्यावरणाकरिता अडचण ठरत आहेत. पिशव्यांमध्ये केरकचरा भरून फेकल्यास त्या पिशव्या पाळीव जनावरे खातात त्यामुळे जनावरांना आजार जडतात. अनेक जनावर प्लास्टिकच्या पिशव्या खाल्याने मृत झाले आहेत. वाऱ्यामुळे पिशव्या अस्ताव्यस्त विखुरल्या जातात.

गावातील लहान-मोठ्या नाल्या, गटारे या पाण्याचे पाऊच, गुटख्याच्या पन्न्या, पत्रावळी व प्लास्टीक पिशव्यामुळे तुंबल्या जातात. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडसर येतो. नाल्यांमधून पाणी प्रवाहित होत नसल्याने दुर्गंधी पसरते. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याची दखल घेत येथील ग्रामस्थांनी अनेक ठिकाणाहून प्लास्टिकच्या पिशव्या जमा करून बस स्थानकावरील आवारात जमा केल्या शासनाने केलेल्या निर्णयाचे स्वागत करून संपूर्ण जमा केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांची होळी केली. यावेळी रविंद्र कोर, रामदास आहिरे, रविंद्र शेलार, योगेश कोर, सुनिल आहिरे, शंकर आहिरे, शिवाजी कोर आदि उपस्थित होते.

शासनाने केलेल्या प्लास्टिक बंदीचा अंबासन गावातून स्वागत आहे. प्लास्टिक वापरामुळे अनेक समस्यांनी तोंड वर काढले होते. - रविंद्र शेलार, अंबासन 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Ban on Plastic at ambasan nasik