बोराळेतील केळींची थेट इराणवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

साकोरा ः बोराळे (ता. नांदगाव) येथील प्रगतिशील शेतकरी भिलासाहेब राजपूत यांची केळीची इराणला निर्यात होत आहे. श्री. राजपूत यांनी आतापर्यंत कांदा, कापूस, केळीची उत्कृष्ठ पिके घेतली आहेत. गतवर्षी दुबईत त्यांनी कांदा निर्यात केला.

साकोरा ः बोराळे (ता. नांदगाव) येथील प्रगतिशील शेतकरी भिलासाहेब राजपूत यांची केळीची इराणला निर्यात होत आहे. श्री. राजपूत यांनी आतापर्यंत कांदा, कापूस, केळीची उत्कृष्ठ पिके घेतली आहेत. गतवर्षी दुबईत त्यांनी कांदा निर्यात केला.
श्री. राजपूत यांनी गुजरातमध्ये 25 वर्षे कापूस खरेदी अधिकारी म्हणून सेवा केली. अनुभवाच्या जोरावर चाळीसगावला जिनिंगमध्येही अधिकारी म्हणून काम केले. त्यांची गिरणा धरणाजवळ 40 एकर बागायती शेती असून, त्यात त्यांना लहान भाऊ दादाभाऊ सोळुंके व साहेबराव सोळुंके यांचे भाचे सुवर्णसिंग जाधव, पुतणे नितेंद्र सोळुंके यांची मदत होते. त्यांचा लहान पुतण्या बलरामसिंग राजपूत याला विदेशी बाजारपेठेचा अभ्यासासाठी चार वर्षे आफ्रिका, दुबई, थांयलंड, इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत या देशांमध्ये पाठविले. आधी अभ्यास करून मग स्वतः आपल्या शेतातील मालाची निर्यात सुरू केली. आज ते स्वत: केळी शेतातून विदेशात पाठवत आहेत. आता परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल विदेश वारीला पाठविण्याचा त्यांचा मानस आहे.

केळीचा एकरी खर्च
एकरी उत्पन्न ः 300 ते 350 क्विंटल
क्विंटलचा सरासरी भाव ः 1000 ते 1200 रुपये
एकूण उत्पन्न एकरी ः तीन ते साडेतीन लाख
सरासरी एकरी खर्च ड्रीपसह ः एक ते सव्वा लाख

बोराळे ते इराण केळीचा प्रवास
केळीची कटाई करून साफ केली जाते. नंतर तुरटीच्या पाण्यात धुवून ताजी केली जाते. एका बॉक्‍समध्ये तेरा किलो प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग करून बॉक्‍समधील हवा काढली जाते. हा माल पिंपळगाव येथे आर्चिड शीतगृहात ठेवला जातो. कंटेनरचा माल पूर्ण झाल्यानंतर तो उरणच्या जेएनपीटी बंदरातून जहाजातून इराणच्या अब्बास बंदरात पाठविला जातो.
---
प्रतिक्रिया
माझ्या अनुभवाचा फायदा कापूस उत्पादकांना करून दिला. आता पुतण्या बलरामसिंग परिसरातील शेतीमाल जास्तीत जास्त निर्यात कसा करेल, यासाठी मी मार्गदर्शन करणार आहे.
-भिलासाहेब राजपूत, निवृत्त अधिकारी व प्रगतिशील शेतकरी, बोराळे
---
माझ्या काकांनी मला शेतीच्या विदेशी बाजाराच्या माहितीसाठी आफ्रिका, दुबई, थायलंड, इराण, इराक या देशात चार वर्षे पाठविले. तिथे जाऊन विदेशी मार्केट जाणून घेतले. त्याचाच फायदा घेत गतवर्षी कांदा दुबईला, तर यंदा केळी इराणला निर्यात केली.
-बलरामसिंग राजपूत, बीएस्सी ऍग्री, अग्री बिझनेस मॅनेझमेंट (एबीएम)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banana of Borale gaon goes to Iran